Sunday, 8 July 2018

एके वारी कैक सवारी


       सवारी? शीर्षक जरा वेगळं आहे ना? नुसतं यमक जुळल म्हणून टाकल अस वाटण अगदीच स्वाभाविक आहे पण फक्तं तितकंच नाहीय. कारण आपल्याकडे तीर्थक्षेत्र आणि त्याचे उत्सव खूप आहेत आणि त्याविषयी जगभर आस्तिक आणि नास्तिकाना देखील आकर्षण आहे. कारण ही क्षेत्र ऊर्जेचा स्रोत आहेत किंवा प्रेरणा आहेत. त्यातलीच एक आपली वारी. ही मी लहानपणापासून पाहतोय, ऐकतोय अन् त्याविषयी वाचतोय शिवाय दोन वर्षांपूर्वी एक दिवसासाठी का असेना पण ४ पाऊले अनुभवली ही आहे. पण नुसत्या निरीक्षणाने ही त्याच्या भव्यतेचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. आणि यात एक नक्की समजू शकत की वारी एक आहे पणं त्यात सवारी कैक आहेत. जशा कि वारकऱ्यांच्या समता व भक्तीची, दिंड्या आणि वारी व्यवस्थापनाची, सेवाभावी लोकांच्या माणुसकीची, असंख्य छोटे व्यापाऱ्यांची, अभ्यासू व जिज्ञासूंची, शेवटी यजमान पंढरपूर आणि चंद्रभागेच्या अगत्याची....!!! एकेका विषयावर पुस्तक लिहीता येईल एखाद्याला इतका याचा अवाका आहे.
        पहिली सवारी वारकऱ्यांची भक्ती याला व्यक्त करावे असे शब्द जगात कुठेही सापडणार नाहीत. कर्मयोगाचा पुरस्कार करणारा विठ्ठल आणि कसला ही त्रास झाला तरी दर्शनाची तीच आस ठेवणारा त्याचा भक्त हे कल्पने पलिकडचे आहेत. प्रश्न समतेचा म्हणालं तर एक गोष्ट मला फार भावली आपलं नाव गाव हुद्दा वय लिंग काहीही असो, जातीच म्हणालं तर तुकाराम कुणबी, ज्ञानेश्वर ब्राह्मण, सेना नाव्ही, सावता माळी, नामा शिंपी, गोरा कुंभार, नरहरी सोनार, चोखा महार तर कान्होपात्रा वारांगना पैकी कोणाचंही बोट पकडून जा वारीत पणं तुम्हाला हाक पडते ती एकाच नावांनी म्हणजे माऊली. ही एकच ओळख राहिली तर गर्व करणार कसला ना? उरलाच थोडाफार ' मी' पणाचा तर चालून चालून घामासोबत तोही गळून पडत असणार याला दुमत नाही.
         दुसरी सवारी म्हणजे वारीचा केंद्रबिंदू म्हणजे दिंडी व पालखी. शेकडो वर्षांची परंपरा, लाखो लोकांचा समूह आहे. पण शिस्तीमधे काही फरक पडला आहे, काही गोंधळ उडाला आहे, २ दिंड्यां मधे काही वाद झाला आहे अस ऐकिवात नाही. गल्लीतल्या २ गणेश मंडळामध्ये सुधा भांडण होत असतात पणं इथे लाखोंनी लोक असले तरी हे सहकार्य वाखाणण्याजोग. कारण त्यांचं वेळापत्रक, क्रम आहे तसाच आहे. कोण कसा जाईल, कुठे मुक्काम, मार्ग, सगळ कस पूर्वनियोजित. रिंगण, त्याला येणारे शितोळे सरकारांचे घोडे हे देखील परंपरेने असतात म्हणे. जिथे १०० च्या गर्दीत दांडपट्टा लागावा आणि लाखोंची गर्दी बिनबोभाट चालत राहावी हे दिव्य आहे.
         नंतर मला महत्वाचा वाटलेली सवारी म्हणजे सेवाभावी संस्था आणि असंख्य व्यापारी. कारण आस्तिक प्रत्येक जण असेल च अस सांगता नाही येत किंवा असला तरी प्रत्येकाला वारीत भाग घेता येईलच हे ही कठीणच आहे. मग वारकऱ्यांची थोडी फार सेवा करून आपण थोड पुण्य पदरात पाडून घ्यावं असा तरी उद्देग असणारे किंवा नास्तिक असले तरी ' माणूस ' म्हणून या प्रवाशांची फुल ना फुलाची पाकळी अशी सेवा करणारे यांचा मला विशेष आदर आहे. ठीके दोन्ही नाही तर असंख्य छोट्या व्यापारी यांचा जीवनावश्यक गरजा किंवा निकड भागवण्यासाठी माफक शुल्क घेऊन काम करणाऱ्यांची संख्या ही भली मोठी. मग त्यात अन्न, वाहतूक, निवास, आरोग्य यावर मोठं अर्थशास्त्र अवलंबून आहे.
         परत आले अभ्यासू आणि जिज्ञासू. भारतीय तर आहेतच शिवाय वारी ही कुतूहल आणि अभ्यास म्हणून करणारे कित्येक परदेशी ही आपल्याला पाहायला मिळत आहेत. बीबीसी नी वारीची दखल घेतली तेव्हा पासून ती जगात पसरली अस म्हणतात. काही जपानी महिला ३० हून अधिक वर्ष अभ्यास म्हणून वारी करतात अस ऐकून आहे. आणि MBA विद्यार्थी प्रोजेक्ट म्हणून हे विषय घेतात हे ही पाहण्यात आलाय. कारण काही का असेना पण आपली परंपरा जगात दिसतेय हे ही नसे थोडके.
         आता शेवट थोडा सुखदायी आणि थोडा विचार करण्या जोगा. एखादे वेळी ८ तास ८ पाहुणे आले तरी काय करू कस करू होऊन चिडचिड होऊ शकते तिथे दरवर्षी ८ लाख पाहुणे ८ दिवसापेक्षा जास्त येतात तरीही पंढरपूर आणि चंद्रभागेच अगत्य जराही कमी नाही होतय ते प्रत्येकाला सामावून च घेतय. पण त्या बदल्यात आपण त्यांना काय देऊ शकतो ? खरं तर धन्यवाद सोडून काहीही नाही. पण आपण सुसंस्कृत अतिथी आहोत, कुठेही गेलो तरी आपला वावर हा नेहमी निरुपद्रवी कसा असेल याची आपण काळजी घेतो मग अजाणते पणी आपल्या कडून अती प्रमाणात कचरा, प्लास्टिक बाटल्या, निर्माल्य जे नदी मधे अडकून पडत, दुर्गंधी येणारे पदार्थ हे इकडे तिकडे पडून त्याचा त्यांना त्रास होऊ शकत. तिथे त्या दिवसात काही टन मलमुत्र जमा होत आणि त्याचा दुर्गंध काही आठवडे राहतो अस वृत्तपत्रात वाचलेलं मला आठवत. आता मलमुत्र विल्हेवाट ही सोय प्रशासन करू शकत कारण त्या सोयी त्यांच्या कडे आहे हे अगदी मान्य, पणं इतर कचरा व्यवस्थापनात सेवाभावी संघटना येत आहेत हे कौतकास्पद आहेच त्यात निदान साथ देऊन काम हलक केलं तर पंढरी ला कृतज्ञता दिसेल किमान. आणि अतिथी देवो भव चां त्यांचा बाणा कायम ठेवण्यात त्यांना धन्यता वाटेल
          आता शेवटी वर कुठेही उल्लेख न केलेली सवारी  आहे एक जी आजकाल जास्त भरती झाली आहे ते म्हणजे हौशी फोटोग्राफर, कवी , लेखक जे आपापल्या नजरेन वारी लोकांना दाखवतात. आणि त्याला कल्पक झालर लावतात...!!
         तशी वारी खूप लोकांना माझ्याहून जास्त माहीत आहे पणं मला समजलेली वारी मी शब्दात मांडली बाकी चूकभूल क्षमा असावी
            ' बोला पुंडलिक वरदे.....!!!'

©प्रसन्न कुलकर्णी [PK]

Saturday, 9 June 2018

थोडा है बस थोडे की जरुरत है....!!!

         कालपासून ST महामंडळाचा पुन्हा एकदा वेतन वाढी साठी संप सुरू झाला. २०१७ च्या दिवाळी मधे या संपामुळे संपकरी, सरकार, पोलीस यंत्रणा आणि मुख्य म्हणजे `सामान्य नागरिक` सगळेच अक्षरशः वैतागून गेले होते. एक महत्वाची विनंती अशी की `सामान्य नागरिक` हा शब्द ते काय बोल्ड, इटालिक आणि अंडर लाईन का काय असत ना तस करून लक्षात ठेवां बर का...!! कारण कस आहे नेहमी आपण सामान्य नागरिक हा शब्द साधारण आर्थिक निकषांवर मध्यमवर्गीय आणि त्या खालचे असे घेतो पण इथे आर्थिक पेक्षा भौगोलिक निकष अभिप्रेत आहेत. म्हणजे महाराष्टातील जिल्हे, तालुके आणि त्यानंतर काही मोठी गाव सोडून इतर ठिकाणी राहणारी सगळी मंडळी म्हणजे सामान्य नागरिक. ज्यांच्या कडे स्वतःचे ४ चाकी वाहन नाही ते सगळे. आता लोक म्हणतील काय इतकं चिरफाड `सामान्य`तेची त्याच कारण एक पुण्याचे सद्गृहस्थ , ज्यांच्या मते ते महाराष्ट्र, भारत फिरले आहेत आणि दुनियादारी ची बरी जाणं आहे त्यांना.
      झालं असं की मागच्या  दिवाळीत आमची भेट झाली होती तेव्हा हा संपाचा विषय निघाला त्यात त्यांची पहिली २-४ वाक्य अशी होती की -
"राजकारण करतात साले...यांच्या कामगार संघटना भरवतात यांना. त्यांचे नेते आणि विरोधक यावर पोळ्या भाजून घेतात. त्यांना म्हणावं करा संप काहीही फरक पडत नाही. तसाही आजकाल बस च्या लाल डब्यात जातय कोण? मला नाही आठवत मी गेल्या २० वर्षात बस मधे पाय ठेवलाय. ट्रॅव्हल्स, ट्रेन्स, गाड्या इतक्या सोयी आहेत च की. लोकांना ब्लॅक मेल केलं की काहीही मिळत अस वाटत यांना. आणि अस ही यांच महामंडळ  तोट्यात च चालुय की. भ्रष्टाचार केला आणि सेवा ही नाही तर नफा येणार कसा... करा म्हणाव बस खाजगी मग नफा मिळेल मग पगार वाढेल. नाहीतर बसा तुमच्यावाचून काहीही अडत नाही."
      "तुमच्यावाचून काहीही अडत नाही" हे वाक्य घोळत राहील आणि त्याक्षणी  मला सामान्य नागरिकांची ही व्याख्या समजली. आणि ते अत्यंत सुजाण असले तरी सगळी दुनियादारी पहिली नसावेत अस वाटल आणि यांचं फिरण सुद्धा पुणे आणि त्यापेक्षा वरील शहर अस असावं. भ्रष्टाचार आणि राजकीय पोळी भाजणे हा एक प्रकार सोडला तर बाकी मुद्द्यात फार काही विशेष दम वाटला नाही. पण त्यावेळी फार आकडेवारी माझ्याकडे नव्हती म्हणून विषय सोडून दिला.
        ऐन दिवाळी मधे माझ्या ओळखीतले किमान २५ जण घरी जाऊ शकले नाहीत हे मला माहीत होत. बऱ्याच जणांना खाजगी ट्रॅव्हल्स त्यात स्लीपर, सेमी स्लीपर, एसी ऑप्शन आहेत किंवा ट्रेन आहेत म्हणून अस वाटत. पण काही ढोबळ आकडेवारी प्रसिद्ध केली गेली होती त्यात वाचण्यात आल की महाराष्ट्रात ४५ ते ५० हजार खेडी आहेत आणि त्यात महत्वाचे जिल्हे, तालुके आणि मोठी गाव अशी १५-२० हजार गाव सोडली तर बाकी ठिकाणी ट्रेन, आणि खाजगी ट्रॅव्हल्स चां आता पर्यंत अस्तित्व ही नव्हत. खेड्यातली लोक गरीब असतात त्यांना उच्च राहणीमान परवडत  नाही हा एक शहरी गैरसमज आहे, पैसा असला तरी लाल डबा हा एकमेव पर्याय असलेली हजारो गाव आहेत. कामगार संघटना भरवतात हे काही अंशी खर असल तरी त्यात तथ्य आहेच की. सर्वात कमी पगार घेणारी संघटना काढल्या तर महामंडळ नक्की पहिल्या पाचात असेल. ९ ते १६ हजार या दरम्यान जास्तीत जास्त लोक आहेत. आणि प्रश्न राहिला नफ्याचा. एक माणूस असेल तरी ती गाडी गेली पाहिजे या तत्वावर गाडी चालते. नफा नाही तर सेवा हा मूळ उद्देश घेऊन ती रस्ता धरते. त्यात नेते, स्वतंत्र सैनिक, अपंग, वृध्द यांना सवलत देणारी एक तरी खाजगी गाडी शोधून दाखवली तरी त्यांना जागच्या जागी बक्षीस. सणासुदीला ट्रॅव्हल्स जेव्हा अव्वाच्या सव्वा दर वाढवून खाजगी वाले पैसे छापत असतात तेव्हा कित्येक जादा गाड्या सोडून लोकांची सोय बघायचं काम ही लाल परी करते. खाजगी मधे किमान वाहक चालक यांची उत्तम काळजी घेतली जाते, ऑन ड्युटी गाडी मधे झोपलेले ड्रायव्हर मी स्वतः पाहिले आहेत.
मिनी, आराम, निम आराम, एशियाड अशा १७००० गाड्या मधून रोज सरासरी ७० लाख प्रवासी घेऊन जाणारी संघटनेची कदर आपण केली तरी फरक काय पडला. अर्थात राजकीय पोळी मुळे बस मधे सुधारणा कमी आहेत पणं आता ती हळु हळु कात टाकत आहे. लाल डबा ओळख पुसून शिवनेरी, शिवशाही किंवा नवीन अश्वमेध अशा नवीन नावांनी रंगांनी आपल्याला भेटत आहेत. लवकरच वायफाय किंवा स्लीपर सुद्धा आपल्यात येत आहेत. आता याचा मोबदला त्यांच्या खऱ्या कामगारांना मिळत नाही हेच आपल दुर्दैव. ते सरकार कोणताही असो. आता यात नाईलाज असेल किंवा नाकर्तेपणा. म्हणून नाक दाबून तोंड उघडाव हा त्यांचा प्रयत्न असावा. ते कितपत उघडेल यावर शंका आहे. फार ही नका देऊ हो तो निदान श्रमाच चीज वाटू द्या भिक नको. असो आपण बोलणार किती आणि कोणाला कारण खाकी रंगाच नशीब च ते आहे सगळ्या रंगात रंगून यांचा रंग च दिसत नाही असो.
      या लाल परी चा प्रवास हळूवार असला तरी नक्कीच वाखानण्याजोगा आहे एक च गाणं आठवत राहत -
      "लाल छडी मैदान खडी, क्या खूब लडी क्या खूब ल डी"

पण हिला अजून समृध्द करायचं असेल तर थोडा है बस थोडा करने की जरुरत है...!!

©प्रसन्न कुलकर्णी [Pk]

Monday, 21 May 2018

युद्ध अटळ आहे 2019


      आधीच disclaimer देतो की ही पोस्ट काही राजकीय नाही. तितकी माझी पात्रता ही नक्कीच नाही आणि मी आधीच ठरवलं होत की राजकारण म्हणजे कानाला खड़ा . पण एक सामान्य मतदार जो राजकारण करत नाही पण जे काही चालू आहे त्यावरून स्वतःच एक मत बनवतो किंवा स्वतःला काही प्रश्न पडतात तितकच या पोस्ट चा अर्थ.
        कर्नाटक निवडणुक. नावाप्रमाणे अनेक नाटक करुन ते वादळ शमल ते येदियुरप्पा च सरकार शमवून च. त्यावर असंख्य प्रतिक्रिया पाहिल्या. घोडेबाजारीला आळा बसला, लोकशाहीचा विजय, सत्तेचा माज उतरला वगेरे वगेरे. अर्थात हे खरच आहे की सत्तेचा माज हा कुठेही नकोच मग पक्ष कोणता ही असो. आणि एकाच पक्षाला मक्तेदारी देणे म्हणजे मनमानी कारभाराला मूकसंमती देण्यासारखं आहे. आणि घोडेबाजार म्हणालं तर हो गोवा मधे राजकारण करून ज्या पद्धतीने सत्ता स्थापन केली गेली त्याला घोडेबाजार म्हणणे चूक वाटणार नाही. आणि अप्पा यानी सरकार सोडल पण शक्य तितके हातपाय मारून पण २२ वर्षापूर्वी अटलजींनी सरकार सोडल फक्त एक मत कमी पडलं म्हणून ते ही नैतिकतेने त्यांची बरोबरी अप्पा सोबत तर होऊच शकत नाही. क्षेत्र कोणताही असो गर्वहरण हवच, ज्याचे पाय जमिनीपासून वर गेलेत त्यांना खाली आणन हे मतदारांच कर्तव्य आहेच. पण लोकशाही ची हत्या टळली ती कशी हे काही कळल नाही. एखाद्या पक्षाच्या जागा अडीच पट वाढून त्या ५०% च्या अगदी जवळ आल्या आहेत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पण तरी सर्वात लहान पक्षाचा मुख्यमंत्री होतोय. हा काही लोकशाहीचा सन्मान तर नक्कीच नाही झाला. भाजपा परतीचा प्रवास करतोय तर असा पक्ष अडीच पट जागा कशा घेईल हे गणित आवाक्याबाहेर आहे. पणं कदाचित झालं ते बर झालं, आपला कामाचंं सिंहावलोकन करायची संधी समजून ती घेतली जावी इतकंच. याचा अर्थ चुकाच अस नाही तर जे काही भूमिका , निर्णय, टीका, कौतुक झाले ते खरच जनहितार्थ होते का? इतकंच. दिल्या मताला आपण जागलो आहोत का इतकंच. जर मी एकट्या माझ्या मताचा विचार केला
        मला अस कायम वाटत की सरकार स्थापन करण आणि टिकवण यात जमीन अस्मानचा फरक आहे. स्थापन कोणीही करेल पणं टिकवायच कस काँग्रेस कडून शिकावं. त्यांनी सुद्धा कित्येक छान निर्णय घेतले कारण सरकार हे लोकांविरुद्ध जाऊच शकत नाही. पण ते अंमल बजावणी समाधान कारक नाही झाली उलट भ्रष्टाचार झाला. २०१४ ला मोदी सरकार  आल  २ कारणांनी एक लोकांना बदल हवा होता काँग्रेस पासून. दुसर मोदींनी 'अच्छे दिन ' नावाचं एक स्वप्न दाखवल होत त्यांची राजकीय समज, इच्छाशक्ती, बोलण्यातली पोट तिडीक दिसत होती. लोकांनी सढळ मत देऊन त्यांना प्रधान पद बहाल केलं. त्याच त्याच प्रश्नांना तीच तीच उत्तर शोधण्यासाठी पेक्षा धाडसी आणि कल्पक निर्णय घेण्याचा निदान प्रयत्न तरी केला अस म्हणण वावग नाही. त्यात नोटाबंदी, वस्तू सेवा कर हे तर गाजलेच शिवाय RERA, make in India, स्वच्छ भारत, जनधन योजना, स्मार्ट शहर आणि डिजिटल भारत, बुलेट ट्रेन आणि मेट्रो. कित्येक देशांमध्ये केलेले विविध करार त्यातून येणार परकीय चलन, आंतर राष्ट्रीय हित संबंध, लष्करी बळ वाढवणे वगेरे. हे सगळ जनहिता मधे गेलं की नाही, त्याच अंमल झालं की नाही, योग्य उद्देश साध्य झालं की नाही हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन. आपण अस समजल की हे जनहितार्थ होत तरी आव्हान वेगळी च दिसत आहेत.
        कारण 'अच्छे दिन ' ही वाख्या प्रत्येकानी ठरवली. आपल्या कडे मतदारांचे पण प्रकार आहेत. काही आहेत उच्च श्रीमंत आणि मोठे उद्योजक ज्यांना धंद्याला पोषक निर्णय म्हणजे अच्छे दिन, काही आहेत मध्यम व्यापारी वस्तू सेवा कर व्यवस्थेत सुलभता म्हणजे अच्छे दिन, नंतर आहेत मध्यम वर्ग त्यांना थोडा फार आयकर शिथिलता, कांदे बटाटे स्वस्त आणि पेट्रोल गॅस दर अच्छे दिन, नंतर गरीब आणि मागास त्यांना आरक्षण किंवा सुविधा अच्छे दिन, आणि याउपर नेते सपक्षिय किंवा इतर ही मलई खायला मिळाली की अच्छे दिन. आता एकाच वेळी या पैकी किती लोकाच्या अपेक्षाना आपण पुरलो हे पाहण आणि त्यांच्या पर्यंत पोचण हे एक आव्हान.
२०१४ च सरकार हे सोशल मीडिया नी जिंकल अस म्हणल जात आस अर्थात हेच बुमरांग आपल्या वर उलटू शकत हे दुसर मोठं आव्हान. लोकशाहीचे ४ स्तंभ जे स्वायत्त काम करतात अस म्हणतात ते म्हणजे माध्यम, अधिकारी वर्ग, न्यायपालिका, संसद/विधिमंडळ. आता विधिमंडळ नेते आणि माध्यम एकमेका साहाय्य करू काम करतात अस भासत. आणि आता कर्नाटक मधे सर्वोच्च न्यायलयाला मधे यावं लागलं. हे ३ स्तंभ जर काही कारणांनी आपल्या विरुद्ध जात असतील तर त्यापेक्षा तीसर मोठं आव्हान काही नाही. शेवटचं म्हणजे सगळीकड स्वायत्त सत्ता घेताना  प्रादेशिक पक्षांना दिलेलं दुय्यम स्थान अंगलट येणारच.आणि काही कष्टाळू कार्यकर्त्यांना त्यांचं चीज नाही मिळालं तरी ते फुटणारच हे चौथ आव्हान.
    २०१४ नंतर ज्या पद्धतीने भाजपाने लागोपाठ गोवा, जम्मू काश्मीर,  आंध्र प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड, आसाम इथे सरकार बनवली. कुठे चतुर राजकारण करून तर कुठे प्रादेशिक पक्षांसोबत युती करून. हिमाचल प्रदेश आणि यूपी मधे तर अक्षरशः धुमाकूळ घातला त्याच श्रेय अर्थात २ वर्ष ठाण मांडून गल्ली ते दिल्ली कार्यकर्त्याची अन नेत्याची मांडलेल जाळ. हा अश्वमेध या आव्हानांवर कशी मात करणार हा एका मतदाराला पडलेला प्रश्न आहे कारण भाजपा  राम राज्याचं स्वप्न दाखवत असली तरी हे महाभारत तर त्यांना लढावच लागेल ते ही आपल्या लोकांसोबत च कारण - युद्ध तर अटळ आहे.

©प्रसन्न कुलकर्णी [PK]

Friday, 23 February 2018

धुरांच्या रेषा हवेत सोडी...!!!

     १२५ कोटिच मनुष्यबळ आपल. आता याला बळ म्हणाव की नाही हा विनोदाचा किंवा वादाचा मुद्दा होऊ शकतो. आता इतका जनसमुदाय म्हणल की इकड तिकड़ फिरण आलच. मग आम्हाला बस, विमान, रेल्वे, कार,ट्राम, वडाप, बाइक, रिक्षा, टैक्सी, बैलगाड़ी, ऊंट, याक, घोड़ा, टांगा, सायकल तर कधी पायी. अस कुवत, आवड, भूगोल आणि उपलब्धता यानुसार निवड करावी लागते. पण या सगळ्यात रेल्वे. भाई बंदी मे कुछ बात है. सोई सुविधेबबदल लोकांच्या बोम्बा असतील पण तरी लै जनता अजुन हिच्या भरोशावर आणि प्रेमात आहे हे नक्की.
     ‎पण इथे  नॉन एसी प्रवास करणारा माणूस हा सोशल लाइफ मधे रस घेणारा, शांत पणे लोकांना पाहणारा, Silent observer च असावा अस माझ ठाम मत आहे. त्याच्याइतक एन्जॉय कुणीही करणार नाही. आपण अजुन बसलो न बसलो पाणी चहा कॉफ़ी, सैंडविच, इडली, चिप्स, कंगवे, पीना, हेडफोन, इयरिंग, बोडिस्प्रे अस अक्ख डीमार्ट समोर आल का काय वाटत? आणि त्याचं मार्केटिंग तर मार्केटिंग च्या पोराला लाजवेल एखाद वेळी. समोर दोन अवकाळी पोर आपल्या आईच्या नाकात दम करत असतात. पलीकडचे काका रेल्वेच्या तालावर होय होय नाही नाही करत असतात तर बाजुला बसलेल कपल सदृश्य जोड़ी कूच कूच करत असतात, हळूच मागुन २ वर्षाच पोट्ट त्यांच्यात डोकावत असत, तर दाराजवळ एखादा नवतरुण गाणी ऐकत दारात इतके intense लुकनी बाहेर बघत असतो तेव्हा नक्की हा सानू च ऐ काश के हम ऐकत असणार अस वाटत. बाकी जनते पैकी ३३% गाणी ऐकत, ३३% झोपेत मॉडलिंग करत आणि ३३% गप्पा टप्पा करत असते. खरी मजा या गप्पा ऐकण्यात. कोणाला जांच होतोय, कोणाच शेत कोणा चुलत्यानी घेतल, आमचा सरपंच कसा बिनविरोध येणार, निवडणुकीचे भाकित, सातव वेतन आयोग, सेंसेक्स चढ़ उतार, पेट्रोल चे दर आणि काय काय. या जगात फुकट ज्ञान फक्त ३ च ठिकाणी मिळत एक सलून मधे, नंतर दारू पिउन पायलट झालेल्या ६० किलो देहरूपी प्लेन मधे, नंतर Non AC ट्रेन मधे. दिसायला ही भव्य रेल आणि लयबद्ध चाल म्हणून हिची दखल बॉलीवुड नि पण लै घेतली. कारण विषय च खोल आहे तसा हिचा.
     ‎म्हणजे गब्बर आणि ठाकुर यांच्यात गोलीबार कुठे ही झाला असता पण कसाय निवांत ४ उडया मारुन स्टाइल इथच शक्य. ती मलाइका बस वर पण छैय्या छैय्या करू शकली असती पण चुकुन खड्डा आला तर नाचू किती कम्बर  लचकली ही लावणी तिथेच झाली असती. दूसर कुठल वाहन घेतल तर जा सिमरन जिले अपनी जिंदगी हा टाइमपास करायला तितका वेळ मिळाला नसता.  हम दोनों दो प्रेमी मधे पंचम नी ट्रैन चा आवाज हुबेहुब काढलाय आता हेच ते ट्रक नि गेले असते तर किंकाळी फोडावी लागली असती. मैं हु ना मधला शाहरुख जर टमटम च्या धुरातून जैकेट घालून बैग खांद्याला देऊन उतरला असता तर ते लै गावठी वाटल असतं फराह खान ला. तर बंटी आणि बबली ला पण धड़क धड़क करत पळून जाता आल नसत. असो.
     ‎पण यात कुठे तरी शिस्त लपलेलि आहे. ही खुप काही शिकवून जाते बहुधा म्हणून उपमा देताना सुद्धा एखाद्या यशस्वी माणसाची गाड़ी रुळावर आली अस तोंडात येत. आणि इंजिनासरख माणसाला माणूस जोड़ा म्हणजे खुप लोकांना घेऊन जाल. हिचा रूट सुद्धा अस दाखवून देत असावा की लाइफ नेहमी सरळ आणि सतत नसते. स्टेशन आल की दोन मिनिट लोकांसाठी थाम्बा आणि पुढे व्ह्या. कधी जंक्शन येईल तेव्हा खुप सारे पर्याय येतील योग्य पाहा आणि कोणाला ही उपद्रव न देता चालत रहा आणि कधी येतो टर्मिनस. तो मार्ग संपला, प्रत्येक वाट पुढे जाण्यासाठी नसते कुठ तरी थांबण आलच.
     ‎शहरातली लोकल पासून सुरु झालेली ही बया आता मेट्रो किंवा बुलेट ट्रेन रुपात आलिय. झूक झुक आगिनगाड़ी च वय गेल कदाचित पण ते अप्रूप कायम राहणार. जस  ‎एखाद्याच्या हॄदयात शिरायचा मार्ग पोटाटून जातो म्हणतात तस ही रागिणी देशाच नस बनत बनत आपल्या नसा नसात भिनली असच वाटतंय.

एक प्रवासी ©Pk

Wednesday, 14 February 2018

दिल्या घेतल्या वचनाची...!!!

     एक जोडप पाहिलय, सहवासाचे ५०-५५ वर्ष पुर्ण केलेल.
तारुण्यात घऱट्यच्या काड्या जमवत उन्हात रापलेल.
तर पोरांच्या सावलीत उतावयात हसत खेळत पहुडलेल.
चिंता वाटावी म्हणाव अस कुठेही काही नव्हतं.

  पण आज सकाळी एक भानगड़ झाली. त्यांच्या हाती लागल एक पार्सल, उघडून ठेवलेल. लाल काळ्या कागदानी बांधलेल आणि चॉकलेट न रिबिन्स नी सजवलेल. शिष्टाचाराचे नियम गुंडाळले आणि त्यांनी त्यात डोकावून पाहिल. पार्सल होत नातीच, लवकरच बदलणाऱ्या मधल्या नावाकडून आलेल. तिन पण न संकोचता आणि खुशित दाखवला ड्रेस, फ़ोटो कोलाज च ग्रीटिंग, सोबत पार्सल मधे टिकेल असा artificial गुलाब असावा.
हे सम्पतय न सम्पतय तोच नातू ही आला थोड्याश्या घाईत.
आज ऑफिस मधे पार्टी आहे. ड्रेस कोड असा आहे. आपल्याला सालसा करायच्या आहे. Etc etc etc.
त्यांनी वाचल होत सकाळीच पेपर मधे आज valetine day आहे. पण त्याचा अवाका इतका मोठा आहे हे तिसऱ्या पिढिकडून कळल होत.
     आता मात्र ते खुप नाराज झाले.  गूढ़ विचारात जाऊन आले. आजी च्या बाजूला ते शांत पणे जाऊन बसले. शब्द जोड़ले २ मिनिट आणि मग बोलते झाले.

"५०-५५ वर्ष झाली नाही ना लग्नाला आपल्या..?"

"हे ५३ व हो. वर्ष तितक आठवत. तारखांच कौतुक थोड़ी होत आपल्या वेळी"

थोडेसे हसत " ते खरच म्हणा. पण तरी मला आज एक प्रश्न पडलाय. पण कदाचित तू हसशील म्हणून गप्प होतो"

" प्रेमाच माप काकण भर ही कमी नाहिय दोघांच. पण व्यक्त करण्यात कुठे कमी पडलो का आपण? हाच ना प्रश्न?" टप्पा पडायच्या आतच आजीनी उचलून सिक्स मारला होता.

"मला जे सांगता येत नव्हत ते नेमकया शब्दात कस मांडलस? मुळात कळल कस?"

"५३ व. वर्ष आहे म्हणल. स्वतः ओळखत नसाल तितक ओळखून आहे तुम्हाला. एकेक वस्तु पाहताना त्या आपल्यात शोधायचा बालिश पणा तुम्हीच करू शकता."

"असेल तस. पण साधारण खीसा आणि लोक काय म्हणतिल मधे खुप काही राहून गेल."

"वय दिसतय आता बहुतेक. विचार करा थोडा. अहो मला मोगर्याचा वास आवडतो. अत्तरापासून धूप पर्यन्त सगळ मोगरा आणाायचा तुम्ही. नको म्हणायची वेळ आली. काही रुपये वाचायची बोम्ब होती त्यात arrears मधून काढलेली पैठणी पाहा आतल्या कपाटातली. अजुन कोणाला हात नाही लाउ दिलाय. आणि तुम्ही या गुलाबानी न ड्रेस नी चिंतित झालात."

"खरच की. आणी टिफ़िन देताना. त्यात येणाऱ्या चिठ्या तर कमाल. Dr नी गोळी बदललीय. नीट पाहुन घ्या. येताना हे आणा ते आणा. आज उपवास आहे. चुकुन पान शेप नका खाऊ फ़राळा नंतर. ही काळजी च्या चिठ्या सुद्धा मला greetings पेक्षा कमी नाही बर का. हा हा हा"

प्रश्न राहिला व्यक्त होण्याचा. तुमचे टोळ भैरव मित्र कंपनी नी आग्रह केल्यावर तुम्ही म्हणलेल ते एक गाण मला आयुष्यभर पुरेल-
"दिल्या घेतल्या वचनाची शपथ तुला आहे." दोघ गुणगुणले

"आता सांगा आपण कुठे व्यक्त होताना कमी पडलो. यांची अजुन सुरवात आहे. आपल लोणच ५० वर्ष मुरलय."

"खरय आता जरा बर वाटतंय. मला माझ्या पेक्षा जास्त चांगल हैंडल करणारी तू कुठे सापडली देव जाणे."
चला मी जरा सराव करावा म्हणतो आता."

"कसला..?"

"पोरिच्या लग्नात तुला दूसर गाण ऐकवतो. हम भी कुछ कम नही दाखवतो ना."

सकाळ पासून अये मेरी जोहरा जबी चे सुर घरात कुजबुजत आहेत. ते असेच राहतील काही दिवस बहुधा.

©प्रसन्न कुलकर्णी [PK]