निवडणूक आणी त्यातले हजारो न्यूटन ~

       निवडणुकीमध्ये आपण प्रोसेस च्या या बाजूला असतो. म्हणजे आधी काही दिवस मतदार यादीत नाव आहे का ते पाहणे आणि निवडणुकीच्या दिवशी जाऊन मतदान करून येणे. पण जेव्हा जेव्हा त्या प्रोसेस च्या पलीकडची बाजू म्हणजे मतदान केंद्र, तिथले अधिकारी असा विषय निघतो तेव्हा तेव्हा मला राजकुमार राव चा न्यूटन सिनेमा आठवतो. त्यात माझे बाबा सरकारी नोकरीत असल्याने लोकसभेपासून ग्रामपंचायत पर्यंत आजूबाजूला कोणतीही निवडणूक आली की त्यांना ड्युटी नक्की लागायची च. त्यामुळे त्या न्यूटन या व्यक्तिमत्त्वाबद्दल प्रेम, आदर आणि सहानुभूती वाटायला लागली.

      एक शहरातला उच्च शिक्षित तरुण सरकारी नोकरी मधे येतो, त्याला मतदार, त्यांचे अधिकार, लोकशाही याबद्दल नितांत आदर असतो आणि ते आपल एक कर्तव्य आहे हे जाणून आपल काम पूर्ण करण्यासाठी आग्रही असतो. त्याची निवडणूक ड्युटी लागते एका आदिवासी भागात. जिथे मतदान सोडा, हक्क, कर्तव्य देखील सोडा, रोजच्या जगण्यात संघर्ष असतो. आज काम केलं नाही तर रात्रीची भाकरी मिळेल की नाही याची शाश्वती नसते. लुटालूट, गोळीबार, आदिवासी, नक्षल कोणी कधी दत्त म्हणून समोर उभा राहील याचा नेम नसतो. एका बाजूला आदर्श, कर्तव्य दक्ष निवडणूक अधिकारी तर दुसऱ्या बाजूला आपल्या कामाशी प्रामाणिक पण रोजच्या जगण्यात शहाणपण आलेला असा पोलिस किंवा आर्मी ऑफिसर म्हणजे पंकज त्रिपाठी. त्याच म्हणणं आहे की इथे लोकांना मतदान वैगरे याची जागरूकता नाही उद्या तुमच काही बर वाईट झाल तर आमच्या नोकऱ्या जातील. त्यापेक्षा तुम्ही इथेच सह्या करा कोणी आलेल नाही म्हणून किंवा गेलात तरी २-३ तास थांबून कोणी येतंय का पाहू नाहीतर गाशा गुंडाळू, पण हा कर्तव्य दक्ष अधिकारी पूर्ण वेळ थांबायचं आग्रह करतो, जेव्हा लोक मतदानाला येत नाहीत हे लक्षात येत तेव्हा तो जाऊन जागरूक करायचा प्रयत्न करतो. की इथे तुम्ही योग्य माणसाला निवडून दिले तर तो तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा, रस्ते , घरे यासाठी मदत करेल. इतक्या प्रतिकुल परिस्थितीत देखील म्हणजे एक माणूस देखील येईल का नाही ही शाश्वती नसताना त्या न्यूटन ला तिथे पूर्ण पद्धत राबवायची असते. टेबल, गुप्त मतदान करण्यासाठी क्युबिकल, शाई लावण्यासाठी रांग वैगरे. २-३ तास कोणी येत नसून देखील तिथे इतर अधिकाऱ्यांनी पत्ते खेळणे त्याला चालत नाही.

       अगदी इतक्या जीवघेण्या परिस्थितीमध्ये नाही पण बाबांना पण अश्या ड्युटी लागायच्या.  कुठे राहायची सोय असते कुठे नसते, कुठे शाळांमध्ये पाणी साचलेल, कुठे थंडी चे तडाखे, कुठे टॉयलेट चांगले नाही. काय काय...शक्यतो कुठे खाण्यापिण्याचे वांदे व्हायचे नाही. शेजार, पाजार, तिथे लोकल कार्यकर्ते, कधी सरपंच वैगरे सगळ्यांना डबे आणून द्यायचे. कधी आदल्या दिवशी रात्री पाळी पाळीने बाहेर जाऊन जेवायला मुभा असायची पण अट एकच सगळ्यांनी ते मशीन सोडून जायचं नाही. ग्राम पंचायती च्या निवडणुकांना कधी काही लोकल कार्यकर्ते उपद्रव पण करायचे पण क्वचित च. तेव्हा मोबाईल वैगरे फार नव्हते तरी ते असे सांगून जायचे की मशीन हातात आल्यापासून त्या गावी जाणे, दुसऱ्या दिवशी मतदान, नंतर त्या मशीन सुरक्षित गावी योग्य त्या जागी पोचे पर्यंत आम्हाला निघता येत नाही वाट पाहू नये.

         न्यूटन मधे दाखवलं तस एखादा च अधिकारी कर्तव्य तत्पर असतो अस नाही....बहुतांश सरकारी अधिकारी कर्तव्य आधी या तत्त्वावर च काम करतो. एखाद च असतो हजारा मध्ये ज्याला वरचा मलिदा महत्वाचा वाटतो. हा अशा आदिवासी भागात, किंवा जिथे जीवाची बाजी लागते तिथे अधिकारी लोकांना पर्याय नसावा तडजोडी शिवाय कारण जीव महत्वाचं.....

अशा हजारो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम करणाऱ्या न्यूटन मुळे हा लोकशाही चा सण साजरा होत असतो....त्यात सगळं काही अलबेल चालत नाहीच, सत्तेवर आल्यावर आपल्या मताला पायधूळ दाखवून काय वाट्टेल ते होईल देखील, पण त्यामुळे मतदाना पासून वंचित राहणे योग्य नाही. आपण लांब राहिलो तर सरकार आणि पक्ष जाऊ दे....या न्यूटन चा अपमान होईल म्हणून तरी आपण हजेरी लावायला हवी.

©प्रसन्न कुलकर्णी.

Comments

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!