रामाच्या निमित्ताने काहीस


         ब्लॉग सुरु करायच्या आधी लहान सहान लेख मी फेसबुक वर लिहायचो. त्यात सर्वात चांगला प्रतिसाद मिळालेला आणि मला स्वतःला खूप आवडलेल्या निवडक लेखापैकी एक म्हणजे "आजीचा राम". आत्ता ही राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा, परवाच झालेली गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी यामुळे परत एकदा लहानपणीच्या काही आठवणी जाग्या झाल्या. 

          दरवर्षी राम नवमी ला उस्मानाबादच्या राम मंदिरात आजोबांचं कीर्तन असायचं. कित्येकदा शाळेला सुट्टी असेल तर मी त्यांच्या सोबत गेल्याच मला आठवतं. तेव्हा मला त्यातल काही कळायचं किंवा आवडायचं का हा प्रश्नच नव्हता. आम्ही भावंडं त्यांच्या सोबत जायचो ते खूप वेळा त्यांची काठी म्हणून किंवा कमी ऐकू येणाऱ्या कानाच यंत्र म्हणून. गीतरामायणचं काय तर, भावगीत भक्तीगीत देखील फारसे मला माहित ही नव्हते आणि कळत तर मुळीच नव्हते. पण त्या रामजन्मवेळेच्या काही मिनिट आधी किंवा नंतर, संगीत शिक्षण नसलेल्या पण गाऊन गाऊन ऐकायला गोड वाटेल इतक्या सुरेल आणि माईक नसला तरी किमान १०० -२०० माणसाला ऐकू जाईल अशा खणखणीत आवाजात ऐकू आलेला- 


    " चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी…..

     गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती…." ( तिथी आणि  

     किती दीर्घ ओढून)

     दोन प्रहरी का ग शिरी ? ( हात आणि डोळे सूर्याकडे    

      वर)

      सूर्य थांबला ? ( समोरच्याकडे प्रश्नार्थक हातवारे)


तो सूर, ती तिथी, तो हातवारा आजही तसाच आठवतो आणि आठवत राहणार.


      हे तर झालं घराबाहेरच, घरात राहणारे सदस्य तर गायक, लेखक, संगीतकार, कीर्तनकार यांच्यासाठी पहिले श्रोते असतात. सादर करणारा त्याला समाधान वाटेल तोपर्यंत ती कलाकृती घोकत राहतो आणि तोवर इतरांची पारायणे मात्र अटळ होतात. त्यामुळे तिथे होणाऱ्या गमती जमती पण वेगळ्या. घरात एखाद लहान मूल असतं, कधी त्याला खेळवण्यासाठी, कधी सवय लावण्यासाठी कधी संस्काराचा भाग म्हणून आपण वेगवेगळ्या माणसाची त्याला ओळख सारखी सारखी करून देतो. म्हणजे कस तर ती गाडी कोणाची तर माम्मा किंवा ते चॉकलेट कोणी दिलं तर मावशी अस काहीस. पुढे पुढे त्यांची ओळख तशीच बनते की हे गाडीवाले मामा किंवा चॉकलेटवाली मावशी वैगरे. हेच काम घरी सराव म्हणून किंवा अचानक सहज लहर म्हणून गाणी गुणगुणताना ऐकू येणाऱ्या पदांनी केलं ~


          " रघुपती राघव गजरी गजरी,

            तोडीत बोरे शबरी"


किंवा कधी चेष्टा मस्करी किंवा आपली कधी काही खुसफुस झाली तर आपण म्हणतो ना जातो मी आता कुठे तरी निघून. तेव्हा देखील आम्हाला  "जाणार आहे मी आता गोंदवल्याला हे कैकदा ऐकायला लागायचं आणि लगोलग एक पद ऐकू यायचं.


          "श्रीरामाचा लळा लागतो त्या तिर्थी जाऊ,

           मना चल गोंदवले पाहू "


ते वरच्या मावशी आणि मामा सारखी रघुपती राघव म्हणत बोरे खाणारी कोण तर शबरी किंवा श्रीरामाचा लळा कुठे लागतो तर गोंदवले ला हे अगदी पक्क बसल डोक्यात. ते मना चल गोंदवले पाहू हे इतक्यांदा ऐकून मी कधी तिकडे गेलो नाही अस वाटत च नाही,  अरे मी तर इथे गेलोय लहान पणापासून हेच पक्क बसलयं, त्याही पुढे जाऊन 


"जयाच्या जनी जन्म नामार्थ केला म्हणत" गोंदवलेकर यांना आठवणारे आजोबा आणि "शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे" स्मरून समर्थांना पाचारण करणारी आजी. तो एक काळ होता त्या दोघांमुळे हे दोन संत नकळत आठवले जायचे आणि आज वेळ अशी आहे की या दोन संताच नाव वाचलं की मला त्या दोघांची आठवण होते. इतकी एकरूपता ही ताकद श्रद्धेची की सगळ्यांना जोडणाऱ्या श्रीरामाची काही कल्पना नाही.

          अजून एक आठवण म्हणजे लातूरला २०-२२ वर्ष आधी साध्वी कनकेश्वरी यांचा रामकथा सप्ताह झाला होता आणि दररोज संध्याकाळी कोणी इच्छुक भक्त किंवा मोठ्या व्यक्ती यांच्याकडे भेटीसाठी जात. तेव्हा यजमानाच्या जवळचे मित्रमंडळी त्यांना भेटायला किंवा दर्शनाला तिथे जात. आजोबांचे एक मारवाडी मित्र यांच्याकडे त्या साध्वी येणार होत्या हे त्यांना आधीपासून माहीत होत. त्या येणार म्हणून आजोबांनी स्वतः दोन पदे लिहिली होती, जर संधी मिळाली तर गाण्यासाठी आणि ती त्यांनी तिथे गायली देखील. त्याच्या पहिल्या पहिल्या ओळी फक्त आठवतात.


पहिलं होत,

" पूज्य संत मा कनकेश्वरी जी पधारी है लातूर……

रामभक्त हम सभी यही के सूनने को है आतुर…"


आणि दुसर होत

" तोडले संसाराचे पाश, केला वासने चा नाश

नाम जपानी केला हा आठवा ( शेवटचा शब्द पूर्ण आठवत नाही)

कुणी माझ्या रामाला आणून भेटवा.".


त्यातल कुणी माझ्या रामाला आणून भेटवा यावर नंतर लोकांनी येऊन येऊन  दाद दिलेली आजही आठवते. वर म्हणलो तसे आम्ही जायचो काठी आणि कानाच यंत्र बनून तसचं या काठीला तिथे जायची संधी मिळालेली म्हणून ही आठवण आणि या ओळी २०-२२ वर्षांनी ही ताज्या आहेत.


प्रत्येक हिंदू घरामध्ये राम आणि कृष्ण हे वेगवेगळ्या रुपात वडिलोपार्जित संपत्तीसारखे वारसाहक्काने पुढच्या पिढीला  अगदी हजारो वर्षापासून मिळत आलेत, आणि हा वारसा हक्क पुढे जायला तुम्ही गर्भ श्रीमंत असा किंवा कर्म दरिद्री काही फरक नाही.  कोणासाठी त्या रूढी परंपरा असतात, कोणासाठी सवयी, कोणासाठी कर्मकांड आणि बोजड, तर कोणासाठी संस्कार. हे घेणाराच्या श्रद्धा आणि विश्वास यावर ठरत. थोडा फार अध्यात्म तुमच्या मनःशांती साठी चांगला असतो हे कळण्याइतका आस्तिक मी तरी आहे. हे जर नाही केलं तर कदाचित त्यांच्या आवाजात ऐकलेलं अजुंन एक पद काही वर्षांनी मला परत आठवत राहील ते ही स्वतःसाठी ही शक्यता नाकारता येत नाही.


"उत्तम जन्मा घेऊनी रामा गेलो मी वाया…

स्वस्थपण अन नाही ठावले तुजला पुसाया.."


©प्रसन्न कुलकर्णी.

Comments

खूप सुंदर लेख लिहिला आहे. वाचुन जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
Anonymous said…
Thanks
Sachin Pawar said…
खरच खूप सुंदर लेख आहे

Popular Post

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!