वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

        कोणती गोष्ट तुम्हाला कोणत्या विचार चक्रात घेऊन जाईल काही सांगता येत नाही. १४ तारखेला दुपारी व्हाट्स अँप ग्रुप ला आईने टाकलेला फोटो आला आणि खाली मेसेज होता, "आम्ही दिवेघाट पार केला. थोडा थकवा जाणवतोय पण बाकी सगळ ठीक".  त्या क्षणापर्यंत कितीतरी मिश्र विचार डोक्यात घोळत होते. त्यात तुम्ही पहिला आणि महत्वाचा टप्पा पूर्ण केला याचा आनंद होता, पुढचा प्रवास कसा होईल याची काळजी होती. पण का माहित नाही तो अत्यंत भव्य, देखणा पांडुरंग पाहिला आणि निश्चिन्त झालो.
        लगेच मला भूतकाळातील दोन गोष्टींची आठवण झाली. सन २००१-०२ मी तिसरीत होतो. गुरुवार होता हे नक्की कारण युनिफॉर्म ला सुट्टी होती. अण्णा ( म्हणजे माझे आजोबा) मला सोडायला शाळेत येत होते. तेव्हा रिक्षा गाडी हे लाड नव्हते, चालतं आजोबांचं बोट पकडून शाळेत जायचं हा रोजचा शिरस्ता होता. वाटेत बाबांचे कोणीतरी मित्र भेटले आणि चला सोडतो दोघांना म्हणाले. मी दोघांच्या मधे बसलो होतो. अजून थोडा रस्ता सरलां न सरला तेव्हा आजूबाजूचे लोक ओरडायला लागले. मला कळत नव्हत काय चाललय पण त्या काकांना कळलं असावं. त्यांनी गाडी पटकन थांबवली. मी मागे वळून पाहिलं आजोबांना चक्कर आल्यासारखं होत होता आणि त्यांचा मागे झोक जात होता. ते रस्त्यावर पडल्यासारखे झाले. त्यांना लहानसा अटॅक येऊन गेला होता. पुढे ते अँजीओ ग्राफी आणि प्लास्टी सगळे सोपस्कार झाले. नंतर ते जवळपास १६ वर्ष ठणठणीत जगले. कधी ही त्या प्रसंगाची आठवण आली की ते सांगायचे कोणीतरी माणूस मागे होता ज्याने मला कोसळण्यापसून वाचवल आणि कदाचित त्याच्या मांडीवर ५ मिनिट मी डोकं ठेवून झोपलो होतो. कोण होता माहित नाही पण माझ्यासाठी तो पांडुरंग च होता. मिष्कीलीने अस ही म्हणायचे की जो स्वतः विटेवर आहे तो माझ्यासाठी ५ मिनिट रस्त्यावर नसेल का उतरला.
        दुसरा प्रसंग म्हणजे ८ वर्ष पुढे २००८ ला. एका भयानक अपघाताला आम्हाला सामोरं जावं लागलं. अगदी जगू किंवा नाही आणि जगलो तरी कसे हा प्रश्न उभा रहावा इतका मोठा अपघात. तेव्हा अचानक कुणाला बुध्दी सुचली माहीत नाही आणि आमचे पाय डॉ. विठ्ठल लहाने म्हणजे मुंबईच्या त्यात्याराव लहाने यांचे लहान बंधू यांच्या लातूरच्या दवाखान्यात गेले. पुढे अगदी आम्हाला ठणठणीत बर केल्यावर असच कोणाच्या तरी तोंडून शब्द पडले की अगदी नावाप्रमाणे डॉ. विठ्ठल हा पांडुरंग बनून आला हो. एखादा क्षण पुढे मागे झालं असता किंवा विषयाची जाण नसणाऱ्या कडे आपण गेलो असतो तर काय झालं असत. तेव्हापासून जेव्हा काही अघटीत घडत आणि आपण मनापासून त्याची आठवण काढतो तेव्हा तो येतो असे उगाच मनात घट्ट बसल होत.
        मला आमच्या घरच्या वारकऱ्यांचा म्हणजे आई, आत्या अन काकू वग्रे यांचा मेसेज पाहून डोक्यात विचार सुरु झाले कि कोणाचं डोकं असेल अशा योग्य जागी ती गगनचुंबी मूर्ती उभी करण्याचं. हजारो लोक चालायला सुरुवात होऊन २ दिवस झालेले असतील त्यात दिवेघाट चा एक लांब आणि  कठीण टप्पा संपत आलेला असेल. सगळी लोक दमून भागून हश्श हुश्श करत तिथे आले असतील इथेच त्यांना तो थकवा पळवून लावणारा, पुन्हा चालण्याची प्रेरणा देणारा आणि मुख्य म्हणजे पंढरपूर गाठल्यानंतर किती समाधान आहे याची एक छोटीशी प्रचिती देणारा असा भव्य आणि तितकाच काळजीने आपल्या वारकरी बाळांना पाहणारा पांडुरंग अगदी योग्य जागी आहे हे नक्की. त्या मूर्तीकडे बघून येणारा उत्साह अगदी त्या अभंगा प्रमाणे "तुका म्हणे सोपी केली पायवाट उतरावया भवसागर रे" अस तुम्हाला भासला असणार याची देखील मला खात्री आहे.
        या वरच्या दोन तीन प्रसंगात आपल्याला ही माहित नसतं खरंच पांडुरंग असतो या मागे की आपला आस्तिक आणि भावनिक दृष्टिकोन तुम्हाला तसा विचार करायला लावतो ते. आपण इतक्या विज्ञानवादी जगात राहून सुद्धा आपल्याला गोष्टी पटतात आणि सुखावह वाटतात हे योग्य की अयोग्य या संभ्रमात मी तरी कायम पडतो. कारण मी तरी धार्मिक आणि आस्तिक असलो तरी देव भोळा नाही. पण कधी कधी बर असत. फार ही विज्ञानवादी आणि नास्तिक असलो की एक ना एक गोष्ट सांभाळण्याची आणि सावरण्याची जबाबदारी तुमची असते. ज्या गोष्टी आपल्या कल्पनेच्या आणि आवाक्याच्या बाहेरच्या आहेत त्यांचं देखील दडपण आपल्यावर येतं. त्यापेक्षा पांडुरंग च असावा या मागे अस मानल की किमान ज्या गोष्टी आपल्या हाताबाहेर आहेत त्या त्याच्या आहेत हे तरी मन मानत. किमान आपण त्यावर विश्वास आणि श्रध्दा ठेवून त्या आशेवर मजेत जगतो.

तुमच्या या प्रवासात कुणाला काही त्रास असतील तब्येतीचे, कुणाला घरी काही कर्तव्य असतील, काही कार्य असे व्यवहार असतील पण या सगळ्या गोष्टी मागे सोडून तुम्ही 'आपल्या' पांडुरंगाला वारीचा प्रवास आत्तापर्यंत मस्त केलात तसाच शेवटचा टप्पा ही मस्त कराल याची मला खात्री आहे. बर नुसती शरीराने तुम्ही वारी केली इतकंच नाही तर तुमच्या काळजीने, तुमची आठवण काढत काढत आम्ही ही तुमच्या सोबत च होतो. कुठे पोहोचले ..? माळशिरसला पोहोचले असतील का....? तिथे रिंगण पाहिलं असेल का? दमले असतील का....? अस करून तुम्ही ६-७ लोक आपापल्या परिवाराला मनाने त्या वारीत घेऊन गेलात. तुम्ही थेट नाव घेत तुमच्या मनात  प्रत्यक्ष आणि आमच्या मनात अप्रत्यक्षरित्या तुम्ही पांडुरंग म्हणजे कृष्ण जागा ठेवलात मग तुमचा प्रवास सुखकर न झाला तरच नवल होत. ते गीतेत म्हणलेली उक्ती इथेही लागू आहेच की,

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ||

ज्याबाजुला श्रीकृष्ण आणि अर्जुन आहेत विजयश्री त्याबाजुला च राहतो अस काहीस.

बाकी तुमच्या प्रवासाचा मी खूप आधीपासून आणि जवळून साक्षीदार आहे. मी तरी यात खूप काही शिकलो, खूप गमती जमती पहिल्या त्याबद्दल पण लिहायचा प्रयत्न करेन च.

"तोपर्यंत श्री विठ्ठलं चिंतयामी..."

©प्रसन्न कुलकर्णी

Comments

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

सावली माडगूळकरांची...!!