मेरा आवाज ही मेरी पेहचान है..!!

       अशनिर ग्रोवर ने एका मुलाखतीत म्हणलेल होत, भारतीय माणूस आणि भारतीय मार्केट हे जगात वेगळं आहे बाकी जगाचे नियम इथे लागू होत नाहीत. अर्थात तो ग्राहकां बद्दल हे सांगत होता, पण हे अगदी विक्रेत्यांना सुद्धा लागू आहे. 
म्हणजे तुम्ही त्यांना जगात भारी अशी काहीतरी अशी काहीतरी टेक्नॉलॉजी द्या पण ते त्यात सुद्धा काहीतरी जूगाड करून त्याला आपल्याला गरजे नुसार आणि सवयीनुसार Indian Touch देतील. UPI ला ते आवाजाचं मशीन लावणे हा त्याचाच भाग होता. अगदी निरक्षर आणि अजिबात Tech Savy नसलेल्यांना ते इतकं मोठं वरदान मिळालं की बस. म्हणजे असं काहीतरी छोटस पण नवीन साधन तयार करावं ही, कल्पना अमलात आणावी अशी उत्पादकांना गरज वाटावी हे आपल्या छोट्या विक्रेंत्याच यश आहे. अशीच आणखी २ अगदी छोटी आणि किरकोळ उदाहरण पाहिली, आणि मला आपल्या जुगाड संस्कृतीच कौतुक वाटत. जे सगळ्यांनी पाहिलेले असतील पण मी कदाचित मी अलीकडच्या काळात मन लाऊन पाहिले म्हणून नीट लक्षात आलं.

केस १:-  पूर्वी आणि आजही हायवे वरती अशी फळं किवा किरकोळ काहीतरी विकणारे लोक असतात. त्यात द्राक्षांचे घड किंवा द्रोणामध्ये जांभूळ, करवंद, सफरचंद अशा फळापासून ते काचा साफ करणारे स्प्रे, मोबाईल स्टँड, चष्मे किंवा काहीही असू शकत. मग ते धावत्या गाडीमध्ये लोकांना दिसावं म्हणून रस्त्याच्या बाजूला ती वस्तू हातात उंच धरून लोकांना दिसेल असं थांबायचं, ज्याला हवी तो थांबेल. प काळाप्रमाणे माणसाला यात त्रुटी दिसत गेल्या हळू हळू बदल होत गेले. सगळीकडे बदल झालेत की नाही हे माहीत नाही पण मी विश्रांतवाडी ते आळंदी या मार्गावर अनेकदा गेलोय तिथले बदल मला जाणवले. कितीही माणूस असा वस्तू हवेत धरून थांबला तरी तो काय विकतोय हे कळेपर्यंत वेगात असलेली गाडी पुढे निघून जाते आणि माणूस असा विचार करतो की जाऊ दे आता पुढे आलोय, पुढे कुठे दिसला तर घेऊ फळं किंवा तत्सम गोष्टी. यावरती २ पर्याय विक्रेत्यांनी काढलेले होते, ज्यांच्या कडे विकणारा एकच माणूस आहे त्याने काळा फळा व खडू सारखं काहीतरी आणलं आणि मोठ्या अक्षरात त्यावर XYZ पदार्थ इतके इतके रुपये लिहून ते लावायला लागला. गाडीतल्या वेगवान माणसाला विचार करायला १०-२० सेकंद देण्यासाठी तो बोर्ड तो ५०-१०० मीटर आधी लावायला लागला, त्यापुढे दुकान किंवा त्याचा ठेला. ज्यांच्या कडे एक हून अधिक माणूस उपलब्ध असेल तिथे १ माणूस १०० एक मीटर आधी उभा राहून तो वस्तू हवेत धरू लागतो म्हणजे मूळ दुकानाजवळ येई पर्यंत गाडीवानाचा निर्णय झालेला असतो. इथपर्यंत काहीही नवीन होत नसलं तरीही माणूस इतकं शिकला की त्याला निर्णय करण्यासाठी समोरच्याला थोडा वेळ देणं आवश्यक आहे आणि वाचण्यापेक्षा visuals ने लक्ष वेधणे जास्त सोपं आहे. नंतर नंतर त्यांच्याकडे स्पीकर आले, ते जोरात त्यावर ओरडू लागले.  कदाचित भरधाव गाडिमधल्या लोकांना visuals पेक्षा ही ऐकण सोपं आहे हे देखील आता माणूस शिकला होता. पण तरी ही त्यात त्यांचा एक माणूस कायम बिझी असणार च होता. आता त्यांना त्यापुढे एक गंमत सापडली. आता त्यांनी त्या स्पीकर ला एक रेकॉर्डेड क्लिप जोडलेली पाहिली. ज्यावर त्याने एकदाच त्याच्याच भाषेत, त्याच्याच विशेष ढंगात वस्तू आणि त्याचा भाव रेकॉर्ड करून ठेवला होता. आता कायम लूप वरती ते रेकॉर्डिंग वाजत राहतय आणि तो स्पीकर त्या लोकानी दुकानाच्या काही अंतर आधी झाडाला किंवा बाजूला ठेवून दिला आहे. आता तो लोकांची मानसिकता आणि त्याला विचार करायला वेळ तो ही कमीत कमी human efforts ने कस साध्य होईल हे शिकला आणि हा जुगाड मला प्रचंड आवडला. त्याने त्याच्या व्यवसायात बदल केला नाही. टोल नाक्यावर विकू कीव महागडी काही दुकान टाकली नाहीत. फक्त ऑटोमेशन चा वापर त्याचे कष्ट कसे कमी होतील हे पाहिलं. आणि शेवटी आपल्या ग्राहकांचा आपल्या आवाजावर च विश्वास आहे हे त्याने ओळखंल असावं. त्याने सगळ बदलल पण ग्राहक आपल्याकडे येण्यासाठी शेवटी आपला आवाज च आपली ओळख आहे हे जाणून ते मात्र शाश्वत ठेवलं.

केस २:-  पूर्वी उसाचा रस त्या लाकडी गाड्यावर काढला जायचा. जो त्याकाळी बैलाने फिरवला जाई, नंतर नंतर माणसे स्वतः च तो फिरवायची. त्याचा तो करकर येणारा आवाज ही त्याची ओळख होती. नंतर त्याच मशीन आलं, ऊस पिळणार धातूचं किंवा लाकडी च मशीन. पण त्या मशीन च्या चाकाच्या मध्यभागी किंवा तत्सम जागी एक घुंगरू लावायला सुरुवात झाली. कोणी सुरू केली ही पद्धत देवास ठाउक पण ही signature sign झाली. कुणाला ही फक्त आवाजावरून कळायला लागलं की इथे आसपास उसाचा रस मिळतो. आज एका ठिकाणी असाच रस एका रसवंती गृहात गेलो. गेल्यावर लक्षात आल की इथे ग्राहक तर नाहीच आहेत आणि मशीन पण तो माणूस आत्ता सुरू करतोय आपण ऑर्डर दिल्यावरती. मग हे घुंगरू कसे वाजतायत आधीपासून. तर त्या बाबाजी ने मोटार टाईप मशीन सारखं लाऊन ते घुंगरू दुकानासमोर झाडाला लाऊन टाकले होते. जे कायम वाजत राहत होते, मशीन सुरू असो की बंद.
    म्हणलं साला याला म्हणतात ग्राहकांच्या सवयी जपणे. मशीन तर अद्ययावत आहे कसला आवाज नाही. पण लोकांना थोडी याची सवय आहे. त्यांना हाक मारायला आणि नोटीस व्हायला घुंगरू तर वाजले पाहिजेत. या आवाजाची ओळख तर पठ्ठ्यानी कायम ठेवली आणि आपल्या जुगाड संस्कृतीची सुद्धा.

भारतात ऑटोमेशन चालेल पण आपल्या नियमानुसार आणि सवयी नुसार... हे मात्र खर...!!

©प्रसन्न कुलकर्णी

Comments

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!