६८ वर्षांची जादूची पेटी...!!

       शाळेत असताना निबंध असायचे ना, सूर्य उगवलाच नाही तर?, प्राणी बोलू लागले तर?, तुम्ही पंतप्रधान झालात तर ? किंवा तुम्हाला भूतकाळात किंवा भविष्यात जायची संधी मिळाली तर ? तेव्हा सुद्धा हे कल्पना रंजन करून मजा यायची अगदी अशात सुद्धा सिनेमामध्ये सुद्धा भूतकाळात किंवा भविष्यात जाता येतील असे सिनेमे पाहिले की आपल्याला अशी संधी मिळाली तर काय असे विचार येत असतात मग तेव्हा ही अनेक प्रसंग आठवतात की हे आपल्याला पाहायला मिळाल तर किती मजा येईल. त्यात छत्रपतींचे किस्से आहेत, पेशव्यांचे आहेत, स्वातंत्र्याचे आहेत, माझ्या शहराचे आहेत, माझ्या कुटुंबातील जुन्या वारसांचे अनेक किस्से आहेत. पण ते काही क्षणापूरते, घटने पूरते किंवा वैयक्तिक स्वार्थाचे आहेत. पण मला जर आज कोणी विचारलं तर खरंच अस काही शक्य झालं विज्ञानाने किंवा जादूने तर मी म्हणेन. मला खुप महापुरुष आणि त्याच्या यशोगाथा आवडतात पण त्या मी रोजच ऐकतो देखील. आणि असही ते सगळं पाहण्यात माझं सम्पूर्ण आयुष्य थिट पडेल. त्याऐवजी मी म्हणेन-
        मला अक्ख एक वर्ष द्या १ एप्रिल १९५५ ते २० एप्रिल १९५६. अक्ख वर्ष मला अदृश्य स्वरूपात जगायला मिळावं. नुसतं अदृश्य स्वरूपात नाही तर अग बाई अरेच्चा सिनेमा मध्ये संजय नार्वेकर ला जसं मनातलं ऐकू येत तस शक्य व्हावं. मग मी हळूच जाऊन बसेन पुण्याच्या पंचवटी नावाच्या बंगल्यात. जिथे त्या पेटी सारख्या दिसणाऱ्या टेबल वर अण्णा उर्फ ग दि मा लिहीत बसलेले असतील आणि मी कसलाही आवाज न करता मांडी घालून, दोन हातांच्या तळव्यांमध्ये हनुवटी टेकवून लहान मुलांसारखा कुतूहलाने पाहत आणि ऐकत बसलेला असेन. आम्ही सुध्दा आयुष्यात ४ शब्द लिहून पाहिले आहेत, भले ते कितीही फाटक, तुटक, साधं आणि केवळ स्वतःपुरत असेल पण ते लिखाण ४ माणसांनी वाचण्याआधी मनात आणि नंतर कागदावर त्यात किती वेळा खाडाखोड होते, किती धाकधूक होते हे जाणून आहे. कागदावर उमटणारे शब्द हे शेवटचे निकाल असतात त्या आधी किती प्रयोग मनात होतात याची गणती नाही. हे सगळं ठिके पण हे एक वर्ष का? हा प्रश्न साहजिकपणे मनात येऊ शकतो. अण्णानी लिखाण तर आयुष्यभर केलंच की...तर १ एप्रिल १९५५ ला गदिमां आणि सुधीर फडकेंच गीत रामायण टेलिकास्ट व्हायला सुरू झालेल. एखादा बालवाडी चा विद्यार्थी थेट मराठी मध्ये पी एच डी आणि संगीता मध्ये विशारद होऊन बाहेर पडेल अस गुरुकुल ठरलं असत ते एक वर्ष माझ्यासाठी.
        म्हणजे बघा गमतीचा भाग म्हणजे पहिल्या च गाण्यात स्वये श्री राम प्रभू ऐकती मध्ये सुरुवातीला लव कुश यांची माहिती सांगताना ओळ येते की,

"कुमार दोघे एकवयाचे सजीव पुतळे रघुरायाचे"

कदाचित ही माहती लव कुश यांची होती पण ती लागू होते बाबूजी आणि गदिमांना पण. असा टवटवीत कलेच्या वृद्ध माणसाला कुमार वयाचे म्हणण्याशिवाय निदान माझ्याकडे तरी पर्याय नाही आणि त्या पुढेच्याच ओळीत आणखी गंम्मत म्हणजे, आपल्यासारख्या माणसाला एप्रिल च्या रणरणत्या उन्हात उसनी देखील रसिकता आणता यायची नाही पण अण्णांच्या शब्दामध्ये मात्र त्यात पण रसिकता आलीय.

"ते प्रतिभेच्या आम्रवनातील, वसंत वैभव गाते कोकीळ"

या गाण्याचा शेवट होताना गदिमांच्या मनात किती काहूर माजलं असलं असेल ते मला पाहायचाय. एक मुरलेला लेखक म्हणून ते शांत असतील ही पण एक हळवा कवी म्हणून ते लिहिताना २ थेंब तरी रडले असतील का ? आणि असतील तरी ही, श्रीराम स्वतः त्यांचा हुंदका थांबवून शैशवा ऐवजी गदिमांना कवळून गेला असेल का अशी भाबडी शंका मला येते. त्या ओळी म्हणजे-

पुरुषार्थाची चारी चौकट
त्यात पाहता निजजीवनपट
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट
प्रभुचे लोचन पाणावती

मध्ये एक कडवं सोडून

सोडुनि आसन उठले राघव
उठुन कवळिती अपुले शैशव
पुत्रभेटीचा घडे महोत्सव
परि तो उभया नच माहिती..!!

जेव्हा पहिल्यांदा मी "राम जन्मला ग सखे ऐकलं" तेव्हा त्यात सांगितलेली तिथी मला तशीच आठवते कायम आणि लक्षात ही तशीच राहते. 

चैत्रमास त्यांत शुद्ध नवमी ही तिथी
गंधयुक्‍त तरिहि वात उष्ण हे किती
दोन प्रहरी का गं शिरीं सूर्य थांबला
राम जन्मला गं सखी राम जन्मला

ते ऐकताना काही क्षणासाठी का होईना पण अस वाटून जात की राम जन्मला तेव्हा सूर्य शिरी येऊन थांबला होता अशी फक्त वेळेची माहिती नाही तर त्याचा सोहळा केला आहे.  केवळ राम जन्मला हे पाहण्यासाठी सूर्य देखील शिरी येऊन थांबला होता असा भास झाल्याशिवाय राहत नाही.

आपण म्हणतो तशा लार्जर दॅन लाईफ प्रतिमा सहज पणे तयार करण्यात गदिमा फार सहज यशस्वी झालेत. म्हणजे बघा ना आकाशाईतकी उंची असलेला राम आणि डोहा इतकी आर्तहृदयी सीता हे सांगायला

"आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे,स्वयंवर झाले सीतेचे"

 इतकीची ओळ पुरली गदिमांना.
 
स्वयंवर करताना असलेला कठीण पण आणि तिथे कर्णकर्कश आवाजात रामाने केलेले शिवधनुष्याचे २ तुकडे हे सांगायला आपल्याला एक अक्ख पान लागेल पण

"तडीताघाता परी भयंकर नाद तोच होई"

इतक्यात झालं या आधुनिक वाल्मीकीच, आपली कन्या रघुवंशात पडतेय हे ऐकून झालेला आनंद सोबतच तो कन्यादानावेळी गिळला जाणारा आवंढा एका ओळीत मांडला गेलाय.


हात जोडुनी म्हणे नृपती तो विश्वामित्रासी
आज जानकी अर्पियिली मी दशरथपुत्रासी"

पण हे मांडायच्या आधी तो मनात किती वेळा खोडला आणि लिहिला गेला असेल तो पाहता यायला हवं, यासाठी मला तिथे जायचय आणि त्यांच्या मनात काय चाललंय, तो कोलाहल मला ऐकायचंय.

मला खूप वेळा हा प्रश्न पडायचा की रामायणात असंख्य प्रसंग आहेत, अनेक व्यक्ती आणि त्यांच्या भूमिका आहेत पण तरी गदिमांनी काही विशेष खास नसलेल्या गोष्टी वरती का एक एक स्वतंत्र गाणं केलं असेल, अर्थात तेव्हा अजून तितकी समज नव्हती. ती दोन गाणी म्हणजे 

"या इथे लक्ष्मणा बांध कुटी" आणि "मज आणून द्या तो हरीण अयोध्या नाथा".

म्हणजे फक्त कुटी बांधण्यासाठी जी जागा निवडली किंवा आजूबाजूच्या परिसराचं वर्णन इतकंच तर महत्व आहे किंवा फक्त त्या हरिणा मुळे झालेलं सिताहरण यापेक्षा त्याच महत्व अस काय आहे? पण परत परत ती गाणी ऐकली आणि थोडं कळत वय झाल. माझे मला काही अर्थ उमगत गेले किंवा मी तसे ते काढले अस ही म्हणू शकतो. आधी सम्पूर्ण गाण्यात तिथल्या परिसरात कसे साधक मुनीजन राहतात, फळे फुले वेली, कोकीळ व इतर पक्षी, हजारो प्रकारची फुले आणि सौंदर्य आहे हे वर्णन केले आणि शेवटी २ कडव्या मध्ये इथे कसे हिंस्त्र श्वापदे राहत असून आपण कायम आपली आयुध तयार ठेवली पाहिजे याचा लक्ष्मणाला सल्ला दिला आहे. त्यातून किती प्रति कुल परिस्थितीत वनवास भोगला याचा अंदाज येऊ शकतो. निसर्गाची रसिकता आणि संकटाची चाहूल याच सुयोग्य भान रामाकडे कस होत हे मांडायला अण्णा विसरले नाहीत. त्या ओळी म्हणजे

"हा सौमित्रे सुसज्ज सावध, दिसली लपली क्षणात सावज
सिध्द असू दे सदैव आयुध, या वनी श्वापदा नाही तुटी."

तर " मज आणुनी द्या हो  हरीण अयोध्या नाथा" हे खरं तर त्या हरींणा च निमित्त झालं पण जानकी साठी हरीण म्हणजे मोठी गोष्ट होती का तर नाही? पण तिला देखील अत्यंत मोह व्हावा अगदी ती साक्षात लक्ष्मी असून देखील. म्हणजे ते हरीण कस असेल? याच कौतुक लिहिताना गदिमा काही काळासाठी आपण पुरुष आहोत हे विसरले असतील का? त्याशिवाय का तो स्त्री हट्त किंवा श्रुंगार लिहिता आला असेल ? स्त्री च्या तोंडी वाक्य टाकणं वेगळं आणि त्यासाठी स्त्री सारखा विचार करणं वेगळं. नाही का?

"चालतो जलद गती मान मुरडीतो मंद,
डोळ्यात काहीसा भाव विलक्षण धुंद,
लागला मृगाचा मला नाथ हो छंद"  

आणि बाबूजींनी पण अगदी २ क्षण तो लडिवाळ हट्ट आपल्या आवाजात आणून पुढची ओळ पूर्ण साजेशी रंगवली.

"जा करा त्वरा मी पृष्टि बांधिते भाता" अगदी माझ्यासाठी हे घेऊन या म्हणून क्रेडिट कार्ड हातात देणारी बायको कुणाला न दिसली तर नवलच.

जटायू ने रामाला जेव्हा माहिती दिली की, माहिती कसली तर अपराधी पणाने वदंता केली की हे रामराया तुझ्या पत्नीला मी नेताना पाहिलं आहे आणि तिला अडवायची मी शर्थ केली पण मला माफ कर मी वाचवू शकलो नाही. जेव्हा जटायू हे सांगत होता, तडफेने, विवश होऊन बोलत होता की-

हे पंख छेदिल्यावरती
मी पडलो धरणीवरती
ती थर थर कापे युवती
तडफडाट झाला माझा, तिज कवेत त्याने घेता.

हे लिहिताना माडगूळकरांची लेखणी ही त्वेषाने चालली असेल का कागदावरती आणि काही क्षणापूरते त्याचे व्रण उमटले असतील का पेटीवरती ते मला शांत पणे आणि अगदी हळूच त्यांचं लक्ष नसताना कागद वर करून पाहायचाय.

तशी अनेक गाणी आहेतच पण इथे शब्द मर्यादा आहेत म्हणून मला आठवतील ती मोजकी वाक्य जी आठवतायत ती.

तसा रामायणात कधीच बीभत्स पणा नाही पण पेटवि लंका हनुमंत मध्ये 

"जळे धडा धडा ओळ घरांची राख कोसळे प्रासादांची" लिहुन तो जरासा डोकावतो किंवा 

"माय लेकरा टाकून धावे, लोक विसरली नाती नावे" लिहिताना करुण रसा च दर्शन होत.

हा बीभत्स पणा किंवा करुण रस केवळ हनुमानाच शौर्य दाखवण्यासाठीच होता अस दिसत, कारण पर राज्यात केलेली कामगिरी दाखवण्यासाठी त्याच उपद्रवमूल्य दाखवण आवश्यक आहे.

मला विशेष आवडणार आणि पराधीन आहे जगती नंतर सगळ्यात जास्त ऐकलेलं गाणं कोणतं अस मला विचारल तर मी सांगेन "आज का निष्फल होती बाण"

जेव्हा राम म्हणतो की
"आज का निष्फल होती बाण,
पुण्य सरे की सरले माझ्या बाहुमधले त्राण?" तेव्हा खरी जाणिव होते की हो बाबा रामाने सुद्धा मानव जन्म जगला आहे. तो सुद्धा हतबल झाला होता आणि जसे आपण वारंवार प्रयत्न करून ही काही ठिकाणी हतबल होतो तसे अनुभव रामाने सुद्धा मनुष्य रुपात घेतलेले आहेत.

आपल्याला देखील आपल्या टिचुक भर ज्ञानाचा माज असतो तसा आणि तो कधी ना कधी आपल्याला जमिनीवर आणतो,कदाचित हेच शिकवण्यासाठी कोणती ही लीला न दाखवता हतबलता दाखवली आहे.

"माझ्याहून ही असह्य झाला, विद्येचा अपमान" किंवा "मला ही ठरला अवध्य का हा तनुधारी अभिमान" याहून त्याची खात्री च पटते.

आणि भूवरी रावण वध जाहला चा शेवट...!!

हे सगळं पेटी वरती बसून लिहिलं गेलं त्याला उद्या १ एप्रिल ला तब्बल ६८ वर्ष पूर्ण होतायत. काल वाचलेली कविता आपल्याला आज कंटाळवाणी वाटते. पण ६८ वर्षांपासून मुरलेल हे लोणचं आणखी चविष्ट तर वाटत आहेच पण त्याची रेसिपी पण न समजण्यापुढे गेली आहे.

अर्थात मी काही भूतकाळात जाऊन अण्णांपाशी जाऊन बसू शकत नाही पण हनुमानाने जस याच गीत मालिकेमध्ये एक वर मागितला आहे तसा मागावा आणि तो आयुष्यभर पाळला जावा इतकंच काय मागाव~

सूक्ष्म सूक्ष्म देहा धरुनी
फिरेन अवनी फिरेन गगनी
स्थली स्थली पण राम कथेचा लाभ मला व्हावा,
प्रभू मज एकच वर द्यावा.

~प्रसन्न कुलकर्णी      
  

Comments

Gauri Bokil said…
Khupach sundar lihila ahes. Abhyaspurvak likhan ahe pn tyat suddha ek sadhepana ahe tyamule vachnara apoaapch tyat haravun jato. Keep it up bhai. Waiting for your next blogs.
Saudnya said…
खूप सुंदर लिहिलंयस,ओघवती वाणी आणि प्रत्येक ओळीचा केलेला आभ्यास तुझी देखील प्रतिभा दाखवून देतो. तुझे लेखन असेच समृध्द व वृध्दींगत होत राहो हीच ई्वरचरणी प्रार्थना.
पुढील लेखाच्या प्रतीक्षेत....

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!