'मूक' बैठक आणि माझी 'बधीर' झालेली भाषा..!!


            सकाळपासून मराठी गौरव दिनाच्या पोस्ट, कविता, दिसत होत्या. खूप दिवसात काही लिहिलं नाही अशी खंत ही होतीच पण सुचत ही नव्हतं काही आणि ठरवलं असत तर तरी तेच घीस पीठ लिखाण झालं असत, एक तर मराठी भाषेचा गोडवा किंवा आपण मराठी असून मराठी का बोलत नाही यावर उपरोध जो दरवर्षी फक्त आज वाचण्यात येतो. जाऊ दे म्हणत आपला दिनक्रम केला आणि संध्याकाळी नेहमीच्या खानावळीत जेवायला गेलो, तिथे जेमतेम ८-९ लोक बसतील इतकी जागा असते. आम्ही जाऊन बसलो तिथे आधीच ४-५ मुलं होती. जेवण यायला वेळ होता म्हणून सगळेच जरा टाईमपास करत बसले होते. त्या काकांनी येऊन काय हवं नको विचारलं आम्हाला आणि त्या 4-5 मुलांना खुणेने विचारलं. ते सगळे मूक बधीर होते किंवा ऐकू येत असावं काही जणांना.
           हळू हळू त्या पोरांच्या खुणेने च गप्पा सुरू होत्या. कोणी मॅच पाहून दुसर्यांना रन सांगत होता, त्यांनी खुणेनेच त्या काकांना काय हवं ते सांगितलं. त्यांचे हातवारे पूर्ण पणे कळत ही नव्हते इतके फास्ट होते, तरी मला काय कळतंय हे मी प्रयत्न करत होतो. जसा जसा वेळ चालला होता मला त्यांचा हेवा ही वाटायला लागला, अपराधी पणा ही यायला लागला कारण नसताना आणि अस्वस्थता ही यायला लागली. इतकं सगळं एकदम का? हा साहजिक प्रश्न पडू शकतो. हेवा यासाठी की आपण ४ लोक भेटलो की मला बोलू च देत नाहीत, माझं कोणी ऐकूनच घेत नाही, मला मुद्दा मांडता च आला नाही, मी बोललेलं त्याला कळलं च नाही हे सगळं रोज घडत असत. पण ज्यांना आवाज काय माहित नाही, कदाचित शब्द कधी उच्चरला किंवा ऐकला नाही ते लोक उत्तम संवाद करत होते. सलग १० मिनिट ते मी पाहत होतो म्हणून खरतर तिथे भयाण शांतता असली तरी मला त्या 5 जणांचा दंगा अक्षरशः ऐकू येत होता. हेव्या सोबत अपराधी पण देखील जाणवत होतं. कारण त्यांच्या नकळत पणे मी त्यांचं निरीक्षण करत होतो आणि कुठे त्यांना हे लक्षात येतंय आणि ते मस्त जगत असताना मी त्यांना वेगळी वागणूक देतोय का हा अपराधी पणा. आणि त्याहून जास्त म्हणजे ते 5 सोडून मी, माझा मित्र, आणि वाढणारे काका आम्ही बोलु ऐकू शकत होतो. आम्हाला हातवारे करावे लागत नव्हते, आम्ही सहज पोचत होतो. हा सहज संवाद होतोय हे त्यांना मी हिणवतोय अस उगाच वाटून गेलं आणि काही गरज नसताना अपराधीपणाची जास्त जाणीव झाली.
           या दोन्ही भावनेपेक्षा तिसरी भावना, म्हणजे अस्वस्थेततेची जास्त भयंकर होती,जी चिरकाळ टिकणारी वाटली. आपण अनेक भाषेत बोलतो, ऐकतो, वाचतो. आपल भाषेवर प्रेम असत, आपण ती टिकावी म्हणून यत्न करतो, राजभाषा म्हणून हट्ट धरतो, इतर भाषिकावर राग ही धरतो, भाषेवर राजकारण ही करतो. हा सगळ प्रेम, हट्ट, माज कशाचा तर भाषेचा, जी आहे म्हणून. ज्यांना संभाषणा साठी कोणत्या ही भाषेचा सहारा मिळत नाही त्यांचं काय? ज्यांना आवाज नाही त्यांना वापरता येईल अशी एक भाषा नाही जगात. ब्लड इज थिकर दॅन वॉटर म्हणतात तस, त्यांचे नातेवाईक इतर इंद्रिय त्याच्या कामाला येतात. आणि भाषा विषयाला झालेली ग ची बाधा कमी करतात. हा झाला बाहेरच्या जगाशी संवाद...ठिके त्यांना ब्रेल मधून मराठी किंवा कोणती तरी भाषा येत असेल असं समजू. पण आपली आवडती भाषा ऐकणं यात वेगळ सुख असत. विशेष करून गाणी आणि कविता याबद्दल बोलु. कारण ते शब्द वाचता येतात ब्रेल मधून पण ऐकणार कस?
लहानपणी रडताना यांची आई आजी कस शांत करत असेल यांना, ये ग गाई गोठ्यात,बाळाला दूध दे वाटीत कस सांगणार यांना किंवा लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपताना दाखवणं आणि ऐकवण यात फरक आहे. आत्या मामा मावश्या हात करून दाखवणं आणि आजोबा आजी मावश्या दोन हे गाणं म्हणणं, किंवा मामाच्या गावाला जाऊया म्हणणं हे कसं पोचवणार आपण?, आपण ऐकतो मराठी मध्ये सुद्धा खूप..मी तर अजून ही मूड नुसार सगळं ऐकतो गदिमां आणि बाबूजीचा गीत रामायण ऐकतो, अरुण दातेचा जुना रोमान्स असलेलं जेव्हा तिची नी माझी चोरून भेट झाली   ऐकतो, बहिणाबाई च मन वढाय वढाय ऐकतो, सुमन कल्याणपूर च असावे घर ते आपले छान ऐकतो, मंगेश पाडगांवकरांचं प्रेम म्हणजे प्रेम असत ऐकतो किंवा कुसुमाग्रजांची पाठवरती हात ठेवून लढ म्हणा ऐकतो, रम्य ही स्वर्गाहुन लंका ऐकतो तर कधी अगदी अशातले रिदम चे बादशहा अजय अतुल ऐकतो, कधी प्रेरणा हवी असेल तर सोडी सोन्याचा पिंजरा ऐकतो, थकलो तर आयुष्यावर बोलू काही ऐकतो किंवा वाट दिसू दे ऐकतो....मी आणि सगळेच मूड नुसार खूप काही ऐकतो आणि त्या गाण्यांमधून व्यक्त होऊन सगळं बाहेर काढतो. यांचं हे अडकून पडलेलं बोलणं कस बाहेर पडत असेल.?

      असे अनेक प्रश्न डोक्यात घेऊन जेवण सुरू झालेल होत...आणि हो माझं ही माझ्या मराठी वरती प्रचंड प्रेम आहेच पण खरच एखाद्या भाषेचा दिवस साजरा करून आपण त्याला मोठं करतोय की लहान हेच कळेनासं होत. ज्याचं भाषेवरती खरच प्रेम असत तो सगळ्या भाषेवरती करतो. आपल्या भाषेचा अट्टाहास धरून स्वतःला आणि इतरांना कमी लेखत नाही. साहित्य चांगलं असेल तर भाषांतर करून ही विकल जातच, म्हणजे भाषेचा अडसर किंवा मर्यादा माणसाला असू  शकतो, साहित्याला नाही.

     तरी ही माझं माझ्या मराठी वरती प्रेम आहेच,आणि त्याच्या शुभेच्छा ही मी देणार आहेच. पण एक गोष्ट लक्षात ठेवून की 'संभाषण' या क्रियेत आणि शब्दात 'भाष' आहेच पण ते नसताना ही ज्यांना संवाद करता येतो त्याचा उत्सव किंवा 'संण' होऊ शकतो. (संभाषण वजा भाष)

असो

©प्रसन्न कुलकर्णी


Comments

Shweta kulkarni said…
सुरेख ����
Satish Bobade said…
मस्तच लिहलंय आणि अनुभव अप्रतिम

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!