बस रेटिंग्स मे याद रखना...!!


       काल रात्री उशिरा झोमॅटो वर काही ऑर्डर केलेलं, तो डिलिव्हरी बॉय 15 च मिनिटात घेऊन आला. जाताना रेटिंग्स द्या हा सर अस म्हणून गेला. तसा हा कंटाळवाणा प्रकार मला फारसा आवडत नाही किंवा त्याबाबतीत मी थोडासा आळशी आहे की कोण त्या अँप किंवा साईट वरती जाऊन रेट वगरे करेल. पण तेव्हा तो अगदी मिस्टर पूर्णब्रह्म बनून माझ्या कडे आला होता आणि अगदी एक ही कॉल न करता बरोबर पत्त्यावर आला होता म्हणून समाधानी होतो ते वेगळं च..!! सढळ हातांनी सगळीकडे ५ पैकी ५ सगळ्या निकषांवर मी वाटून टाकले आणि बाहेर पडतो तितक्यात अजून एक नोटिफिकेशन आलं. How was your dinner ? Please rate restaurant म्हणून. त्याला म्हणलं तुझं आणि वेगळं असतंय का? म्हणलं घे..तू भी क्या रखेगा..!! पण इकडे विचार चक्र सुरू झालं होतं.
       अशात रेटिंग्स या गोष्टीशी किती वेळा संबंध आलाय हे आठवत होतो. गूगल मॅप वाले जागे साठी, प्ले स्टोरवाले अँप साठी, हॉटेल वाले,लॉज वाले, ओला कॅब वाले, झूम कॉल वाले, duo वाले वगरे वगरे वगरे..!! इतकंच काय ऑफिस मध्ये ही बोनस साठी..!! निश्चित च रेटिंग्स ही एक चांगली पद्धत आहे आपला उत्पादन किंवा सेवा यांची अनेक निकषांवरती मोजमाप करत राहण्याची. अगदी डिलिव्हरी बॉय किंवा ओला ड्रायव्हर यांना तर न विचारता पत्ते सापडणे, बोलण्यातली अदब, स्वच्छता हे ही निकष आहेत. निश्चित ही एक उत्तम गोष्ट भारतात रुजतेय हे नक्की. खोटं बोलणे, अपमानास्पद बोलणे, सुट्टे पैसे, खराब दर्जा अशा अनेक गोष्टीं या मधल्या लोकांकडून होतात. सगळे नाही अगदी ५-१०% लोक तसे असतील पण त्यामुळे बदनामी सेवा आणि उत्पादक कंपनीची होत असते. या रेटिंग्स सिस्टीम मुळे त्या आडमुठ्या लोकांना सरळ करायला मदत होतेच शिवाय जे चांगली सेवा देतात त्यांना पावती सुद्धा मिळते. बहुसंख्य लोक कधीच खोटं बोलत नाही. ते काहीतरी म्हणतात ना तुम्ही थोड्या काळासाठी अनेक लोकांना मूर्ख बनवू शकता, तुम्ही थोड्या लोकांना दीर्घकाळासाठी मूर्ख बनवू शकता पण तुम्ही अनेक लोकांना दीर्घकाळासाठी मूर्ख बनवू शकत नाही. म्हणून तर आपण ऑनलाइन गोष्टी खरेदी करताना सुद्धा रेटिंग बघतो दोन वस्तूंपैकी एखाद्या वस्तूला काहीशे लोकांचं रेटिंग असेल आणि दुसऱ्या वस्तूला काही हजार रेटिंग असेल तर आपण दुसरी वस्तू घेतो. माणसांना मिळणार रेटिंग्स यावर तर त्यांचे बोनस, ओव्हर टाइम हे देखील अवलंबून असतात. विशेषतः कॉर्पोरेट मध्ये तर हे फार फोफावल आहे. खर तर कामाची गुणवत्ता, अचुकता या निकषांवरती रेटिंग व्हायला हवं पण कित्येकदा अंतर्गत पॉलिटिक्स, संबंध किंवा कित्येकदा तर हाजी हाजी करणाऱ्याला ते अधिक दिले जातात. दुर्दैवाने फक्त त्या रेटिंग्स मुळे ४ पैसे मिळतात त्यासाठी हतबल झालेलं मी पाहिल आहे.
       जुन्या हिंदी सिनेमामध्ये डॉक्टर च्या तोंडी एक हमखास वाक्य असायचं- अब इन्हे दवा की नही दुवा की जरूरत है. तस मला इथे जाणवत- तशी भारतीय लोक संवेदनशील आणि प्रेमळ मानली जातात. आता रेटिंग पद्धतीने सेवा सुधारत असलो तरी कैक वर्ष आपण ग्राटिंग पद्धतीने सेवा देतोय. जाता येता राम राम करणारे दुकानदार, कुणी आजारी / गरोदर  असेल तर आधीच रिक्षा किंवा गाड्या सांगून ठेवणे, घरी काही अडचण असेल तर फक्त हाक मारून घरपोच ते ही उधारीवर सामान येऊन पडणे, अरे वा छोटी ताई आली का आज बाबा सोबत अस म्हणत २-५ रुपयांच चॉकलेट दुकानदार काकांनी च देणे हे सगळं फक्त आणि फक्त येता जाता ग्रीट करायच्या म्हणजे फक्त जिभेवरच्या साखरेच्या खड्यानी होत असे. आता तुम्ही वाटेल ते पैसे मोजा, सेवा तितकी च मिळेल पण त्या प्रत्येक सेवेमागे रेटिंग आणि त्याची किंमत आहे. काळाचा महिमा म्हणून रेटिंग पद्धत घ्यावीच लागेल पण थोडी थोडकी का असेना ग्रीटिंग पद्धत टिकून राहणे ही भारतीयांची गरज आहे कारण ती त्यांची ओळख आहे आणि वेगळेपण आहे.

नंतर एखादा सेवेकरी बस रेटिंग मे याद रखना अस म्हणताना आपल्याला हसून धन्यवाद किंवा नुसतं टाटा करून गेला तरी आपण यात यशस्वी झालो अस म्हणता येईल.

©प्रसन्न कुलकर्णी

Comments

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!