भारताची लोकशाही आणि कृष्णाचं विश्र्वरूप दर्शन

         काही महिने आधी धनश्री लेले यांचं गीतेच्या अकराव्या अध्यायाच निरुपण ऐकण्यात आलं. आधी असलेली थोडी फार माहिती त्यांनी अत्यंत रंजक पद्दतीने मांडली त्यामुळे जास्त लक्षात राहिली आणि शिवाय तो विचार खूप वेगळ्या अर्थाने डोक्यात घोळत होता. त्याच कारण तो असा कि-

          पहिल्या ९  अध्यायामध्ये भगवंतानी सांख्य योग, ज्ञान योग, कर्म योग, कर्म सन्यास योग असे अनेक योग सांगितले तरी अर्जुनाचं पूर्ण समाधान झालं नव्हत, अनेक प्रश्न पडत होते. म्हणून १० व्या अध्यायात तो म्हणतो कि हो बाबा मला मान्य आहे भगवंता सगळ्याचा दाता, परम ब्रह्म, परम धाम तूचआहेस, आम्ही शेवटी केवळ तुझ्यात एकरूप होण्यासाठी आसक्ती रहित कर्म करत जगले पाहिजे पण तरी मला सांग "केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ?" म्हणजे "कुठे कुठे मी तुला शोधू शकतो, तुझं निरंतर चिंतन करू शकतो ?". लगेच भगवंत म्हणतात कि " हन्त ते कथयिष्यामि " कि बाबा रे ऐक आता मी तुला सांगतो माझी सगळी रुपे. मग एकेक करून भगवंत अर्जुनाला सांगतात कि बघ " अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च - सगळ्या प्राणी मात्रांचा आदि मध्य आणि अंत मीच आहे, वेदानां सामवेदोऽस्मि  - वेदांमध्ये साम वेद मी आहे, इन्द्रियाणां मनश्चास्मि - सगळ्या प्राण्यांच्या सगळ्या इंद्रियामध्ये जे मन आहे ते मी आहे,  सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः - सगळ्या सेनापतीमध्ये स्कंध मी आहे तर जलाशयांमध्ये समुद्र मी आहे, स्थावराणां हिमालयः जगात ज्या स्थिर गोष्टी आहेत त्यात हिमालय मी आहे, प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम् -  दैत्यांमधे मी प्रल्हाद आहे तर गणना करतात त्यांमधला काळ अर्थात समय मी आहे , मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् - सगळ्या पशुंमध्ये सिंह तर पक्षांमध्ये गरुड आहे, अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च - अक्षरांमध्ये म्हणशील तर मी अकार आहे आणि समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे, त्यापुढे जाऊन मासांमध्ये मार्गशीर्ष , ऋतू मध्ये वसन्त, शिक्षेमध्ये दंड तर गुप्त ज्ञानामधे मध्ये मौन म्हणजे देखील मीच आहे. इतकं सगळ ऐकून अर्जुन अगदी हरखून गेला, पण होता शेवटी मनुष्य च. त्याच काही समाधान झालं नाही. त्याला भगवंताला पाहण्याची प्रबळ इच्छा झाली आणि सुरूवात झाली अकराव्या अध्यायाला.

          अर्जुनाने प्रश्न आणि इच्छा व्यक्त केली कि "द्रष्टुमिच्छामि ते रूपमैश्वरं पुरुषोत्तम - कि आपलं ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, बल आणि तेजयुक्य शरीर पाहण्याची इच्छा मला आहे" आणि क्षणाची हि विलंब न करता श्रीकृष्ण म्हणतात कि " पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः । नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च  - हे बघ पार्थ आता नाना प्रकारची, रंगाची , वर्णाची हजारो रूप तू माझ्यात पहा" आणि ते भव्य विश्वरूप दर्शन घडवतात. ते सगळ ऐकल्यानंतर मला हा प्रश्न पडला कि आपण काही अर्जुनासारखं ते रूप कधी पाहू शकणार नाही. भगवंताशी निगडितच असं नाही आपण कोणती तरी एखादी गोष्ट अशी पाहू शकतो का जी इतकी भव्य आहे, ज्यात सगळं काही आहे तेज आहे, बल आहे, सगळे रंग, सगळ्या भावना , सत्कर्म कुकर्म काहि जरी असले तरी ते सगळे मिळून एकाच दिशेने जात आहेत अस काही, कुठे तरी एकत्र सामावून जात आहेत. धार्मिक,भौतिक काही का असेना ? पहिलं उत्तर आल ब्रह्मांड. पण तो फार मोठा भाग आहे त्यात आत्ता ही सगळ व्यापलेलंच आहे पण मला दिसेल कळेल असे काही असेल का ? अनेक दिवस या प्रश्नाचं उत्तर काही सापडत नव्हतं. पुढे कधी तरी काही लेख वाचण्यात आले भारत देश, त्याची भव्यता, जैव विविधता, एक देश एक समाज म्हणून थोड्या नाही १०० कोटी हून अधिक लोकांना घेऊन झालेली प्रगती याबद्दल हे लिखाण होते. तेव्हा ती जुनी अपूर्ण कल्पना पूर्ण झाली वाटल की देश तर अनेक असतात, पण इतका मोठा १४० कोटीचा देश आणि त्यात अजून हि स्थिर असलेली लोकशाही हे विश्वरूप दर्शनातं केलेल्या वर्णनाला अगदी साजेशी गोष्ट आहे. फक्त ते भगवंताचं रूप नसून लोकांनी लोकांसाठी केलेल्या लोकशाहीच स्वरूप होत. मग मी तोच अध्याय हळू हळू परत एकदा वाचयला घेतला पण वेगळ्या चष्म्यातून.

          त्या विराटरूपावेळी अर्जुनाला आणि आधीच दिव्यदृष्टी असलेल्या संजयला काय दिसलं  तर - अनेकवक्त्रनयनम अनेकाद्भुतदर्शनम् । अनेकदिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् - अनेक तोंड आणि डोळे असलेली, दिव्य अलंकार आणि शस्त्रधारी परमेश्वराची विराट आकृती आणि आपल्या कडे नाही का १४०  कोटी जनतेला सांभाळणारी सरकारी यंत्रणा, त्यांचे हजारो लोक, पोलीस ,  आर्मी, सफाई कामगार, आरोग्य खाते, दळणवळण, शिक्षक, शेतकरी त्यांची वेगळी आयुध आणि अवजारे हि पण अनेक डोळे तोंड असलेली विराट मूर्ती च ना?. पुढे काय तर दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम् - अनेक प्रकारची दिव्य माला आणि दिव्य गंध असलेली प्रतिमा- आपली सगळी यंत्रणा आणि सामान्य नागरीक किती प्रकारचे बिल्ले लावून असतात डॉक्टर, टीसी, आर्मी, सरकारी, खाजगी, पोस्ट, अग्निशमन वगरे. अगदी सुगंध, दुर्गंध, फुले, जंगले प्राणी, कचरा, मलमूत्र असे सगळे बरे वाईट वास देखील त्यात आले. तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तमनेकधा - सगळ विभागलेलं जग कृष्णामध्ये मात्र एकत्र दिसत. आपली सगळी राज्य, धर्म, जाती,  एकमेकांविरुद्ध किंवा सोबत असलेली कार्यालये, संघटना, वेगळी दले, सरकारी पक्ष, सुरक्षा दले, आदिवासी, अगदी गुन्हेगार देखील लोकशाही मध्ये एकत्र दिसतात. नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप - अर्जुन म्हणतो कि मला तुमचा आरंभ, अंत काही सापडत नाहीय. आपल्याला देखील आपला भव्य देश आणि लोकशाही त्याची पाळंमुळं कधीतरी सापडतील का ? शांतपणे आवाज न करता करण्याऱ्या अनेक संस्था, सरकारी, लष्करी लोक कुठे कसे. पोचलेले असतात याचा मागमूस लागेल का?. त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानम् - तुम्ही कोण आहेत तर जगाचे परम आधार, धर्म रक्षक, अविनाशी आहेत. आपण पण आपल्या संविधानाला, आपल्या न्याय व्यवस्थेला तितकंच प्रमाण मानून चालतो. जे काही आपल्या आयुष्यत अयोग्य सुरु आहे त्याला रोखायची आणि लोकशाही बळकट करायचं काम त्यांच्या आधाराने च होईल हे आपण मानतो. गन्धर्वयक्षासुरसिद्धसंघा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे - तुमंचाकडे गंधर्व, यक्ष, राक्षस सगळे पाहून चकित होत आहेत. जसे आपल्या कडे प्रत्येक संघटना सत्कर्मी आणि दुष्कर्मी कायदा, सुव्यवस्था, याकडे पाहत जगतात. वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि - पांडव असो वा कौरव जेष्ठ कनिष्ठ चांगले वाईट सगळे तुमच्या मुखामध्ये जाताना दिसत आहेत आणि तुमच्या दाढांमध्ये चाऊन मारली जात आहेत. देशात साधं मरण येणारी, अपघाताने मरण येणारी, खुन किंवा फाशी मध्ये जाणारी किंवा अगदी देहत्याग करणारी पद्धत वेगळी असाली तरी आपल्यासाठी त्याचा निकाल एकाच आहे- मृत्यु. आणि काही दिवसांनी त्याची आठवण हि न राहणे. हि लोकशाही बळकट होताना किती लोकांचे कसे कसे प्राण गेले कोणी युद्धात गेले, कोणी अपघातात गेले, कोणी भावकीच्या वादात गेले, कोणी आत्महत्येने गेले कोणी कसे पण यामुळे नियम बनत गेले, संस्था घडत गेल्या, सुरक्षा संघटना बनल्या. ते मृत्य झालेले यात आपलं छोटा योगदान देऊन गेले. यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति । तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति जसे सगळ्या नद्या शेवटी समुद्राला जाऊन मिळतायत सगळे नरवीर पेटत्या तुमच्या मुखात जात आहेत. अनेक युद्ध अनेक चकमकी पाहिलेल्या या देशाने समोर मृत्यू माहित असताना त्यात स्वेच्छेने गेले. आणि शेवट कडे जाताना अर्जुन विचारतो कि आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववर प्रसीद - मला सांगा कि हे भयंकर रुप धारण करणारे आपण जे आहात त्यांना माझा नमस्कार. तुम्ही खरेच आहात कोण ? आपण देखील जर विचारल कि इतके चांगले वाईट लोकांचे बलिदान घेऊन, रोज हजारो लोकांची कष्टाने, घामाने हा देश उभा आहे हे करणारे खरेच कोण असतील ? तर. श्रीकृष्णाने एका वाक्यात उत्तर दिल. " कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो - मी काळ आहे सगळ्यांना संपवणारा सगळ जे नवीन ताजे चेहरे आहेत त्यांना काळ म्हणून जुना करणार आणि घेऊन जाणारा काल आहे. आणि आपल्या प्रश्नाला उत्तर मिळेल मी देशाची लोकशाही आहे जी सगळ्याना सामावरून घेते आणि सम्पवते हि. सगळी सेवा, स्वार्थ, उपकार, परोपकार, निष्ठा, धोका, दगे, लाचारी, भ्रष्टाचार सगळ माझ्यात सामावून घेणारी लोकशाही आहे मी. तुमच्यासाठी हे चांगल किंवा वाईट असेल माझ्यासाठी सगळ सारखं. अटल बिहारी म्हणायचे तसे लोक, पक्ष, सरकार येतील जातील हा देश राहायला हवा, आणि तो राहील च.


    सगळे पाहून अत्यंत भारावून, नतमस्तक होऊन अर्जुन म्हणतों कि अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात्प्रणयेन वापि  आणि यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु । एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं तत्क्षामये त्वामहमप्रमेयम्   ! - अजाणते पाणी , रागाच्या भरात, झोपताना, खाताना पिताना कधी मी काही चुकीचे बोललो असेल तर मी क्षमा मागतो. अगदी तसाच भाव आज झेंडावंदन करताना आपल्या डोक्यात येत नाही का ? कि या देशात अनेक अडचणी आहेत, अनेक नेते, संस्था वाईट काम करतात, कधी अपघात होतात, मला खूप त्रास होतो हे खरंय तेव्हा मी काही उद्विग्न होऊन चुकीचं बोलत असेल हि पण हे देश फार सुंदर आहे, भव्य आहे आणि मला भाग्य आहे इथे राहायचं त्यामुळे काही बोललं गेलं असेल तर त्या व्यक्ती किंवा संस्थेला असेल देशाला नाही....


हि कल्पना किंवा दिलेली उपमा सगळ्यांना पटेल किंवा पटावी असं नाही पण खुप दिवस डोक्यात होत आणि स्वतंत्र दिन आणि कृष्ण जन्म एकत्र आल्याने हे मांडायला निमित्त मिळालं हे नक्की.


©प्रसन्न कुलकर्णी 

9028360892

Comments

Popular Post

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!