मुलाखत....!!


       सध्या trending असलेली उद्धव ठाकरे आणि संजय राऊत किंवा आधीच्या अक्षय कुमार- नरेंद्र मोदी किंवा राज ठाकरे- शरद पवार अशा मुलाखती मुळात मुलाखती नसतात च आणि त्या देणाऱ्यांना ती देण्यात काहीही विशेष साध्य ही करायचं नसत. एकतर तर कोणत्यातरी गोष्टीवरून लक्ष हटवणे, आपण आहोत याची लोकांना आठवण करून देणे किंवा त्यांना एखाद मत किंवा टिप्पणी करायची असते त्यासाठी त्यांना योग्य प्लॅटफॉर्म मिळत नसतो तो उपलब्ध करून घेणे यापेक्षा त्यात काही वेगळा उद्देश असेल अस वाटत देखील नाही. पण मुलाखतीच महत्व केवळ तितकंच असू शकत नाही तर एका पट्टीच्या ऐकणाऱ्यासाठी गप्पागोष्टी पलीकडे ती बरच काही देऊन जाते.
       कुणी मला odd man out किंवा outdated म्हणलं तरी हरकत नाही, पण मला अशा मुआलखती ऐकण्याची आवड अनेक वर्ष आहे अगदी आजही. मी स्वतः क्रिकेट खूप कमी पाहतो पण विक्रम साठे ची 'What the duck' मुलाखतींचे बरेचसे एपिसोड मी पाहिले आहेत किंवा गौरव कपूर चे Breakfast with Champions चे जवळपास सगळे भाग मी पाहिलेले आहेत, कपिल शर्मा मी पाहतो ते फक्त मधल्या गप्पा ऐकण्यासाठी बाकी पांचटपणा वगळून, आप की अदालत मधे माझ्या आवडीचे आलेले अभिनेते, नेते यांचे कित्येक भाग कित्येक वेळा बघून झालेले आहेत, याशिवाय खुपते तिथे गुप्ते (जुना सिझन), माझा कट्टा, संजय मोनेच कानाला खडा किंवा जितेंद्र जोशीच दोन स्पेशल हे देखील मी मना पासून पाहिलेले आहेत. थोडासा काही काळ मागे गेलो तर मच्छिंद्र कांबळी हे वस्त्रहरण नावाचा मुलाखतींचा कार्यक्रम करायचे तो पण काहीच्या काही भारी होता अर्थात मी तेव्हा फार लहान होतो म्हणून ते कळेल इतकी अक्कल नव्हती पण नंतर बरेच भाग यूट्यूबवर पाहिलेले आठवतात.
       पण या सगळ्याच मुलाखती या श्रवणीय असतात अस नाही. मिळमिळीत बोलणं,फक्त पॉलिटिकली करेक्ट राहून किंवा जितकं विचारलं तितकं च बोलण हे काही रसिकांसाठी मेजवानी असू शकत नाही. अर्थात सगळे सारख्या स्वभावाचे नसणारच पण काहीतरी उपजत स्वभाव दाखवणारं ठळक व्यक्तिमत्व किंवा एखाद नाटकी अथवा आव आणलेलं असू द्या पण ऐकणाऱ्याला खिळवून ठेवणारी मुलाखत असेल तरी त्यात गंमत येते. नुसता मुलाखती हा विषय निघाला तरी चुटकीसरशी काही नाव नजरेसमोर येतात जशी की- तेंडुलकर, सेहवाग, गावसकर, श्रीकांत, स्मृती मंधना, हर्षा भोगले, कपिल शर्मा, नवज्योत सिंह सिद्धू, गांगुली, अटल बिहारी, फडणविस, अजित दादा, राज ठाकरे, बाळासाहेब, आर आर पाटील, विलासराव, जितेंद्र जोशी, सौमित्र, सोनू निगम, गुलजार, जावेद अख्तर, स्वानंद किरकिरे, अनुराग कश्यप, अनुपम खेर, सलीम खान, सयाजी शिंदे, प्रशांत दामले वगैरे वगैरे. ही जी मंडळी आहेत यांच्या मुलाखती ऐकून ऐकून पारायण झाली आहेत आतातर. ही आपापल्या क्षेत्रात उत्तम काम तर करत आहेतच पण शिवाय त्याबद्दल बोलताना त्यांची आस्था, त्यांचे भन्नाट किस्से, त्यांचा स्ट्रगल, त्यांच्यातल माणूस पण, त्यांची कला, सारख्याच गोष्टींना वेगळ्या पद्धतीनें हाताळायची हातोटी हे सगळ जितकं सगळ्यांना प्रेरणादायक वाटत तितकं हे सगळ सांगताना त्यातला साधेपणा, सहजता आणि नजाकत हे कायम मला हुरळून टाकतात, पण त्याउलट अशी ही काही नाव आहेत जी त्यांच्या क्षेत्रात अती भारी आहेत  पण मुलाखती देताना थोड संकोचतात किंवा हातचं राखून बोलतात. मग अशा मुलाखती केवळ सार्वजनिक औपचारिकता बनतात, ना त्यात मुलाखतकाराला मजा येते ना प्रेक्षकांशी नाळ जोडली जाते.
       ही झाली एक बाजू पण मुलाखत हा दोन्ही बाजूंनी खेळायचा खेळ आहे ना? Batsman किती चांगला आहे हे बघायचं असेल तर Bowler तसा हवा ना.... एखादी गृहिणी लाख सुगरण असेल पण खाणारा खवय्या असायला हवा ना....एखादा शायर ताकदीचा असेल पण त्याला इर्शाद देणारा हवा ना....त्या बॉलर, खवय्या आणि इर्शाद ची भूमिका मुलाखतकाराची. मुळात तो जिज्ञासू, चिकित्सक आणि पुरेसा गृहपाठ केलेला असायला हवा ना....म्हणजे प्रश्न दिलेत तितके विचारायचे आणि मधेच वाह वाह अरेरे करत राहायचं इतकीच सावध आणि दूरस्थ त्याची भूमिका नको. एका उत्तरातून दुसरा प्रश्न त्याला सुचायला हवाच आणि तो विचारायची मुभा त्याला असायलाच हवी. आधीच माहीत असलेले प्रश्न आणि तयार केलेलं उत्तर यात ती गंमत नाही. 
        सगळ्यात कठीण जबाबदारी मुलाखतकार आणि त्याहून प्रेक्षकांवर अधिक असते ते म्हणजे संवेदनशीलता आणि रसिकता जपण्याची, बोललेल्या वाक्यांपेक्षा बोलता बोलता कोणत वाक्य टाळलं हे आपोआप उमजल पाहिजे आणि कोणत्या जागी बोलणाऱ्या ला आवंढा गिळण्यासाठी वेळ द्यायचा आणि कोणत्या जागी बरोबर टाळ्या देऊन त्याला दाद द्यायची इतकी समज श्रोत्यात पाहिजे. एकच batsman त्याच Bowler कडून प्रत्येक वेळी कॅच आऊट च होईल असं थोडी आहे कधी बोल्ड होईल तर कधी विकेट सोडणार पण नाही. पण प्रत्येक वेळी प्रश्न आणि आवाजातले चढउतार दोन्ही बदलत राहणे ते पण हळुवारपणे उलगडत हे मुलाखतकार नावाच्या bowler च कसब. Nervous Ninety मधे नव्वदित अनेकदा बाद झालेला किंवा tennis elbow ने त्रस्त सचिन आणि १०० शतक मारून, भारतरत्न मिळाल्यानंतर चां सचिन सारखं बोलणार नाहीत, हिंदुत्वाचा टेंभा न वापरता उच्च पदावर गेलेले फडणवीस किंवा अटलजी आणि मित्रपक्षांनी पाडलेल्या सरकारांनी हतबल फडणवीस आणि १ मताने १३ दिवसांच सरकार पडलेले अटलजी हे वेगळे बोलतील, सखाराम बाईंडर सांगाणारा सयाजी शिंदे आणि झाडं लावा आणि जगवा हे कळकळीने सांगणारा आणि स्वतः देखील तसा वागणारा सयाजी हे एकसारखे बोलणार नाहीतच, आप मधून उद्विग्न होऊन बाहेर पडलेला कुम्मार विश्वास आणि हिंदीचा प्रचारक, प्रसारक कुमार विश्वास हे वेगळे बोलणारं. त्या विषयामधली आणि त्या वेळेमधली संवेदनशीलता समजून घेणं हे ज्याची त्याची आवड आणि कसब......

मला थोडीफार पुस्तक वाचायला आवडतात पण मला जर कुणी पर्याय दिला की तुला त्या माणसाचं पुस्तक वाचायला आवडेल की त्याला ऐकायला आवडेल तर मी कायम म्हणेन मी मला त्याला किमान दोन तास ऐकायला आवडेल. अर्थात पुस्तकासारखी सखोल माहिती त्यात नसेल कदाचित पण जे त्या दोन तासात एकंदर body language बरच काही बोलून जाईल...ते जाडजूड पुस्तकामध्ये कधीच सापडणार नाही..

हे सगळ का सुचलं असेल मला हा कुणाला प्रश्न पडला असेल तर त्याच उत्तर हे की आजच्या  उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतून ती कशी नसू नये आणि परत एकदा सुधीर गाडगीळ यांची माझा कट्टा किंवा दोन स्पेशल मधली मुलाखत आठवून ती कशी असावी ही दोन्ही मत ठाम आणि स्पष्ट झाली इतकंच.

©प्रसन्न कुलकर्णी

Comments

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!