डोपामाईनचे चाळे अन पैशांचे खेळ

        डोपामाईन नावाचं द्रव्य मानवी शरीरात असत म्हणे जे आपल्या सुख, आनंद, कौतुक किंवा एखादी यशप्राप्ती याच्याशी निगडित असत. अर्थात हा शब्द माझ्या अशात ऐकण्यात आला  आहे आणि त्याबद्दल मला फार माहिती आहे अस नाही पण मला जे शब्दात मांडायचय त्या साठी याची मदत घेतोय. तर परत मुद्द्यावर आता जे डोपामाईन आपल्या थेट कौतुकाशी जोडलेलं आहे तेच आपल्याला attention seeker बनायला लावत. मग ते चांगलं दिसणं असेल, लिखाण, संगीत, कविता, भाषण, फोटोग्राफी, चित्रकला, खेळ आणि जे जे वेगळेपण जपता येईल असं आहे ते सर्व काही माणूस आपल्या आनंदासाठी करत असेल च पण त्याच कोणी कौतुक केलं कि ते डोपामाईन छेडलं जात आणि हुरळून जाणे किंवा तेच छंद वारंवार जपायला प्रेरणा वगरे मिळणे असे प्रकार होतात. आता सोशल मिडियाने म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि ते टिक टॉक  वेग्रे यांनी तर माकडाच्या हाती कोलीतच दिलंय. मुळात हे सगळे प्लॅटफॉर्म च Human Behaviour ला मोहात पाडून त्यांना नादाला कसं लावता येईल या technology वरच तयार झालेले आहेत. नुसतं डोपामाईन नाही तर आणखी जे काही ज्ञात-अज्ञात मायाजाल आहेत ते सगळे सुरेख गुंफलेले आहेत. म्हणून आपल्या नाना कला इथे टाकून किंवा फोटोस टाकून त्यावर लाईक, कंमेन्ट्स पाहायचा मोह कोणी टाळू शकत नाही.
             याच्या पुढची गम्मत अशी की या डोपामाईन चा संबंध पैशाशी यायला लागला. कारण फक्त कौतुक किंवा attention नाही तर सुख, आनंद ही याचे घटक आहेत. लहान पणा पासून सरप्राइजेस अर्थात अनपेक्षित गिफ्ट्स हे मानवी सुखाचं मोठं कारण आहे. लहानपणी चॉकलेट किंवा कोल्ड ड्रिंक वर स्टिकर यायचे.हे स्क्रॅच करा आणि गिफ्ट्स मिळवा. ते कुतूहल डोपामाईन छेडायच आणि त्या नादाने पोर आणखी खरेदी करायचे. हे झालं लहान मुलांच, मोठे मोठे लोक पत्ते, जुगार, लॉटरी चे तिकीट खरेदी करायचे कारण अचानक मिळणारा पैसा ज्यामुळे त्यांचं डोपामाईन ट्रिगर व्हायचं. त्यात दुहेरी आनंद होता एक तर पैसा मिळेल आणि दुसरं माझं नशीब किंवा माझी हात चलाखी किती उत्तम आहे ही सुखद भावना. पण लॉटरी, जुगार, पत्ते हे तसे निषिद्ध खेळ असल्यामुळे लोक चोरून करायचे किंवा फार कॉमन नव्हतं. पण जसा जसा मोबाईल प्रत्येक हातात गेलाय आणि नवीन मार्ग सहज उपलब्ध आहेत तसा हा खेळ भयंकर होऊ शकतो, असा विचार उगाच डोक्यात फिरतोय. याची सुरुवात paytm, गूगल पे, फ्रिचार्ज नी केलीय अस वाटत. सुरुवातीला paytm मध्ये कॅशबॅक यायचे अगदी प्रत्येक व्यवहाराला. नंतर गूगल पे आलं. त्यांनी ते स्क्रॅच सिस्टम सुरू केली. म्हणजे व्यवहार पूर्ण करून स्क्रॅच करे पर्यंत तुम्हाला माहीत नसतं की काय मिळेल. पण काहीतरी मिळेल या आशेने तुम्ही व्यवहार करत जाता आणि त्यांचा धंदा सुरू राहतो. नंतर नंतर तुम्हाला फक्त बेटर लक नेक्स्ट टाईम चे मेसेज दिसतात पण एव्हाना सवय लागलेली असते. 
             आता लिहायचा मुद्दा, कॅशबॅक ची रक्कम लहान असते म्हणून ते सोडून दिलं तरी चालत. पण जिथे मोठी रक्कम येते तिथं प्रश्न वाढतात. जस की-
             
◆फार पूर्वी नाही पण ८-१० वर्ष आधी ही आणि आज ही टीव्ही, पेपर मध्ये जाहिराती येतात. LIC किंवा इतर विमा कंपनी च्या. मुळात पूर्वी आपल्या मरणानंतर आपल्या मागे लोकांची सोय करणे हे भारतीय लोकांच्या ध्यानी मनी नव्हतं म्हणून विमा आणि गुंतवणूक असे मिक्स प्लॅन LIC ने आणले. त्यात त्यांचा दुहेरी उद्देश साध्य व्हायचा एकतर त्यांचा बिझनेस वाढायचा आणि लोकांमध्ये पैसा, बचत आणि गुंतवणूक याबाबदल जनजागृती व्हायची. जिन्दगी के साथ भी आणि बाद भी वगरे रुजायला पण आपल्याकडे कैक वर्ष लागली. आता विमा बऱ्यापैकी रुळला आहे. आता एक स्टेप पुढ-
◆ त्यानंतर हळू हळू अजून एक जाहिरात दिसायला लागली. म्युच्युअल फ़ंड सही है ची. अर्थात त्यांचा हि उद्देश चांगला च होता. लोकांमध्ये हे नवीन आणि जास्त उत्पन्न देणारे साधन सवयीचे व्हावे.ज्यांना शेअर्स, बॉण्ड वगरे ची माहिती नाही पण इच्छा आहे त्यांना त्यातल्या त्यात सेफ मार्ग मिळावेत आणि पैसा हि येत राहावा मार्केत मध्ये. त्यासोबत Mutual Funds are sub to market risk हि तळटीप हि फेमस झाली त्यावरून लोकांना यात risk आहे याची जाणीव होत राहिली. या जाणिवेमुळे आज ही माझ्या बाबांच्या वयाचे लोक पटकन आज ही पैसे टाकायला धजावत नाहीत. पण म्युच्युअल फंड ने क्रांती केलीच. महागाई वर आणि निवृत्ती ची सोया म्हणून त्याकडे पाहिलं जात आज.
◆आता थोडं आणखी पुढे जाऊ. गेल्या 2 वर्षात आणखी 2-3 जाहिराती गोंधळ घालत आहेत ते म्हणजे online Rummy खेले, किंवा आप क्रिकेट टीम बनालो ये आपका काम हम कर लेते है. याची सुरुवात काही 50 रुपये च्या आसपास असते. असे मी डझन भर लोक दाखवू शकतो जे म्हणतात की अरे 50 रुपये तर आपण भेळ पाणीपुरी वर घालतो लागला तर लागला तुक्का वगरे नाहीतर 50 रुपये भेळ खाल्ली समजायच. बरोबर पण आपल्या देशात वयाच्या ५-७ वर्षांपासून क्रिकेट चे फॅन असतात. कशापासून आणि कुठे ही क्रिकेट आवडणारी जनता आपल्या कडे आहे. याच व्यसन 50 रुपये करत करत कुठे घेवून जाऊ शकत याचा अंदाज नाही. याचा एक छोटा अनुभव मीच पाहिला. एका मित्राच्या रूम वर त्याचा रूममेट शिकायला आलेला त्याने 49 रुपये लावले आणि म्हणाला अरे इतके तर चहा वडापाव ला जातात. मी ( अर्थात मनात )म्हणलं अबे #### मग चहा पी ना लेका. बाप घरचा पावकिलो चहा कमी आणून तुला पैसे देत असेल आणि तू इथं चहा न पिता टीम च्या नरड्यात ओत. असो हे देखील इग्नोराय नमः केलं पण-

◆ गेल्या दोन महिन्यात दोन जाहिराती आणखी पाहिल्या आणि माझी तार च गेली. AMI oraganics चा IPO ओपन होतोय अशी जाहिरात टीव्ही वर आली. आधीच भारतात ली 95% जनता अर्धी वेडी.एकवेळ पूर्ण शहाणे परवडले किंवा पूर्ण वेडे, हे अर्धे हळकुंड म्हणजे महाभयंकर. मुळात शेअर्स , बॉण्ड्स, म्युच्युअल फंडस् कसे काम करतात हे 2-5 वर्ष अनुभव असलेल्या माणसाला देखील पटकन कळत नाही आणि टीव्ही हा सम्पूर्ण तळागाळात जाणारा स्रोत आहे. वरकरणी याचा उद्देश लोकांपर्यंत पोचणे असा असला तरी सध्या IPO चा इतका बोलबाला आणि क्रेझ सुरू आहे की मध्ये जुन्या एका क्लिप चा PP WATERBALS  पाणीपुरी चा  ipo ची क्लिप आलेली तशी गल्लीतल्या झेरॉक्स वाल्याने IPO काढला तरी तो 10 पट खपेल. मी स्वतः देखील 3 IPO apply केलेत पण सुदैवाने माझ्या आजूबाजूला चांगले लोक आहेत जे मला अत्यंत मोलाचे सल्ले देत असतात आणि गुंतवणूक शिकवतात सट्टे नाही. लोक अंधाधुंद पैसे टाकताना पाहतोय मी. देव न करो एखादा झपका असा बसला तर परत याला जुगार म्हणून कायम च टाटा करायला हीच लोक असतील.
◆ हे सगळं कमी होत म्हणून परवा एक सिरीज पाहत होतो. त्याआधी एक जाहिरात आली. एक श्रीमंत Character आपल्या पैशाचा माज दाखवत असत. आणि एक साधारण character त्याला खिजवून जात की Crypto मे invest किया क्या? अगर नहीं किया तो क्या खाक इन्व्हेस्ट किया वगरे. इथे लोकांना crypto म्हणजे काय? त्याला भारतात कायद्याने किती सुरक्षा आहे? आपली किमती जमापुंजी किती लावावी? हे कळत नसताना अस काहीतरी बिंबवण कितपत योग्य आहे माहीत नाही. पण झटपट पैसा आणि त्यातलं डोपामाईन परफेक्ट छेडलं जातंय ही काळजी इथला धांदवाईक माणूस घेत असतो बरोबर.

वॉरेन बफे आणि राकेश झुणझुणवाला यांचे दोन वाक्य मला फार भावतात
वॉरेन म्हणतो- "Invest in the things that you understand"
आणि राकेश म्हणतो- "Dont afraid to make mistake but make sure, you make which are afforable to you."

किती सोप्या भाषेत सांगितलं या लोकांनी, जे कळत नाही त्यापासून लांब राहा किंवा आधी समजून घ्या मग उड्या मारा.

असो हे कळत असताना ही आपण काहीही करू शकत नाही. कदाचित सरकारांची सुदधा याला मूक संमती असेल, कायद्यात काय लिहिलं आहे हे महत्वाच नाही जर त्यात पळवाटा असतील तर. गंदा है पर धंदा है.

थोडक्यात काय तर कुठे ही पाहिलं तरी तुम्हाला संभ्रमात आणि मोहात पाडतील असे अनेक मार्ग आहेत. काही ते मार्ग सर करतील, काही त्यात पडून शिकतील, काही दुसरे पडलेले पाहून शिकतील, तर काही असे पडतील की परत वर येणं कठीण जाईल.

एक गाणं आठवतंय सचिन च
" ही दुनिया मायाजाल मनुजा, जाग जरा..
हसू नको तू सावध वाग रे मनुजा जाग मनुजा जाग"

©प्रसन्न कुलकर्णी

Comments

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!